पश्‍चिम बंगाल हिंसाचारातील मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची भरपाई

कोलकाता, दि 6 – पश्‍चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर झालेल्या हिंसाचारात ठार झालेल्या 16 जणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. आज पत्रकार परिषदेमध्ये बॅनर्जी यांनी ही घोषणा केली. निवडणुकीच्या काळात कूच बेहार येथील सीतालकुची भागात केंद्रीय सुरक्षा पथकाकडून झालेल्या गोळीबारादरम्यान मरण पावलेल्या सर्व पाचही जणांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला गृहरक्षक दलात नोकरी दिली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

कुछबेहार मधील गोळीबाराची सीआयडी मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दरम्यान 10 एप्रिल रोजी ही घटना घडली होती.

निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचारात एकूण 16 जण ठार झाले आहेत. त्यापैकी बहुतांश जण भाजप, तृणमूल कॉंग्रेस आणि संयुक्‍त मोर्चाचे कार्यकर्ते आहेत. या सर्वांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये देण्यात येतील, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. भाजपला निवडणुकीत जनादेश मिळालेला नाही आणि भाजपकडून पश्‍चिम बंगालमध्ये हिंसाचार भडकला गेल्याचा आरोपही बॅनर्जी यांनी केला.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन 24 तासही झाले नाहीत आणि राज्यात केंद्रीय पथके यायला सुरुवात झाली आहे. कारण भाजपला पश्‍चिम बंगालमधील निवडणुकीचा निकाल पचवता आलेला नाही. भाजपने निवडणुकीचे निकाल मान्य करावा अशी आपली विनंती त्यांनी केली. राज्यात करोनाची स्थिती भयावह आहे. या परिस्थितीवर आपल्याला लक्ष केंद्रित करू द्यावे. कोणत्याही संघर्षांमध्ये आम्हाला पडायचे नाही, असेही त्या म्हणाल्या.

पश्‍चिम बंगाल मधील हिंसाचाराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या चार सदस्यांचे पथक आज पश्‍चिम बंगालमध्ये दाखल झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.