येडियुप्पांनी भाजपच्या नेत्यांना दिले 1800 कोटी?

कॉंग्रेसने केली चौकशीची मागणी:येडियुरप्पांनी केला इन्कार

नवी दिल्ली – आयकर खात्याने कर्नाटकातील भाजप नेते येडियुरप्पा यांच्यावर घातलेल्या छाप्याच्यावेळी त्यांची एक डायरी आयकर खात्याला सापडली असून त्यात येडियुरप्पा यांनी केंद्रातील भाजप नेत्यांना तब्बल 1800 कोटी रूपये दिल्याच्या नोंदी स्वत: येडियुरप्पा यांनी आपल्या हाताने केल्या असल्याचे वृत्त द कारवान नावाच्या एका नियतकालिकाने दिले आहे. त्याचा आधार घेत कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. हे प्रकरण खरे आहे की खोटे ते पंतप्रधान मोदींनी स्पष्ट करावे अशी मागणीही त्यांनी केली असून या प्रकरणी लोकपालांकडेही दाद मागितली जाऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान येडियुरप्पा यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे कॉंग्रेस बावचळली असून त्यांनी हा खोडसाळ प्रचार सुरू केला आहे असे येडियुप्पांनी म्हटले आहे.

डायरीतील या नोंदी सन 2009 सालातील असून ती डायरी सन 2017 पासून आयकर विभागाच्या ताब्यात आहे. पण त्यावर पुढे कोणतीही चौकशी झाली नाही. ही चौकशी का केली गेली नाही असा सवालही कॉंग्रेसने उपस्थित केला आहे. या डायरीतील नोंदीविषयी कारवान नियतकालिकाने म्हटले आहे की कोणाला किती पैसे दिले याच्या नोंदी स्वत: येडियुरप्पा यांनी आपल्या डायरीत केल्या असून डायरीतील प्रत्येक पानावर त्यांनी सहीही केली आहे.

त्यानुसार येडियुरप्पा यांनी आडवाणी, अरूण जेटली, मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, इत्यादी नेत्यांना कोट्यावधी रूपयांची रक्कम दिली असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे, असा दावा काही संकेतस्थळांनी केला आहे. एवढेच नव्हे तर गडकरी यांच्या मुलाच्या लग्नासाठी दहा कोटी रूपयांचा निधी येडियुप्पांकडून देण्यात आल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे असे कारवान नियतकालिकातील वृत्तात म्हटले आहे. या डायरीतील काही पानांच्या झेरॉक्‍स प्रति आज कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी पत्रकार परिषदेत सादर केल्या. चेंडू आता पंतप्रधान मोदी यांच्या कोर्टात आहे. चौकीदार चोर आहे का, चौकशीला तयार आहे, याचा निर्णय आता त्यांनी घ्यायचा आहे, असे सुर्जेवाला यांनी म्हटले आहे.

दरम्यान बीएस येडियुरप्पा यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. ही सारी माहिती बोगस आणि खोटी असल्याचे आयकर खात्याच्याही लक्षात आले आहे असे त्यांनी म्हटले आहे. आपण डायरी लिहिण्याची सवयच नसल्याचा दावा करताना ज्यांनी हे वृत्त दिले त्याच्यावर बदनामीचा खटला दाखल करण्याचा आपला इरादा आहे असेही येडियुप्पांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद कॉंग्रेसचे आरोप फेटाळताना म्हणाले की, कॉंग्रेसच्या या पत्रकार परिषदेची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. हा एवढा मोठा घोटाळा उघड झाला असताना आम्ही सकाळपासून कॉंग्रेसच्या अध्यक्षांच्या पत्रकार परिषदेची वाट पाहत होता. मात्र त्यांनी ते काम स्वत: करण्याऐवजी सुर्जेवाला यांच्याकडे कसे सोपवले अशी टिप्पणीही त्यांनी केली. केद्रीय कर मंडळाने यासंदर्भात अगोदरच निवेदन जारी केले असून ते पाहायला हवे असेही त्यांनी नमूद केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.