पूरग्रस्तांच्या खात्यावर उद्यापासून जमा होणार 10 हजार रुपये

विजय वडेट्टीवार यांनी दिली माहिती

नागपूर – राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राला पुराचा तडाखा बसला असून अतोनात नुकसान झाले आहे. यानंतर राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, शुक्रवारपासून म्हणजेच उद्यापासून 10 हजारांची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार आहे, अशी माहिती मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

या मदतीसंदर्भातील माहिती देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. रोख रकमेचे वाटप केले तर पैशाचे वाटप योग्य पद्धतीने न होता गैरप्रकार होण्याची शक्‍यता होती. यामुळे उद्यापासूनच पूरग्रस्तांच्या थेट खात्यात हे पैसे जमा करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

तसेच प्रशासनाला पुरग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने पंचनामे करत 8 दिवसांत अहवाल सादर करण्याच्य सूचना देण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण राज्यातील हा अहवाल केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, पावसामुळे 4 लाख हेक्‍टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचेही ते म्हणाले.

नांदेडमध्ये 80 हजार हेक्‍टर शेतीचे नुकसान झाले असून तिथे एकाच दिवशी 166 मिलीमीटर पाऊस पडला. काही ठिकाणी तर 400 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोयनाच्या परिसरात 48 तासात 1072 मिलीमीटर पाऊस झाला आणि 17 टीएमसी पाणी साठ्याची वाढ झाली. ढगफुटीपेक्षा हे भयानक आहे. यावरून निसर्गाचे संतुलन बिघडत चालले असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी अनेक समित्यांचा अभ्यास करावा लागणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.