आरआरबी अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती
नवी दिल्ली: रेल्वे एनटीपीसी आणि ग्रुप डी च्या भरती परीक्षांना आणखी विलंब होऊ शकतो. एनटीपीसी आणि ग्रुप डी ही रेल्वेची सर्वात मोठी भरती आहे, त्याअंतर्गत अनुक्रमे 35 हजार आणि 1 लाख पदांवर भरती होणार आहे. “रेल्वे सध्या परीक्षा आयोजित करण्यासाठी एजन्सीच्या नेमणुकीवर काम करत आहे. एजन्सीची नेमणूक अद्याप पूर्ण झालेली नाही, परंतु लवकरच एजन्सीची नेमणूक पूर्ण होईल. अशी माहिती रेल्वे भरती मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.
“रेल्वे भरती मंडळ मार्चमध्ये भरती परीक्षा घेण्याची शक्यता आहे. एनटीपीसी किंवा ग्रुप डी मध्ये प्रथम कोणती परीक्षा घेण्यात येईल याचा निर्णय घेण्यात आलेला नाही, आम्ही दोन्ही परीक्षा एकाच वेळी घेऊ शकू.” एनटीपीसी आणि ग्रुप डी परीक्षेच्या तारखा जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये जाहीर होतील असा अंदाज आहे. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वे भरती मंडळाने एनटीपीसीच्या 35,208 पदांच्या भरतीसाठी 28 फेब्रुवारी रोजी एक अधिसूचना जारी केली होती. या पदांसाठी 1 कोटी 26 लाख 30 हजार 885 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अधिसूचनेमध्ये, परीक्षेची संभाव्य तारीख जून ते सप्टेंबर 2019 दरम्यान लिहिलेली आहे. मात्र, मंडळाने 15 ऑक्टोबर रोजी नोटीस बजावून परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली होती.
त्याचबरोबर ग्रुप डीबद्दल सांगायचे झाले तर ही रेल्वेची आतापर्यंतची सर्वात मोठी भरती असून याअंतर्गत 1 लाख 3 हजार 769 पदे भरली जातील. या भरतीच्या अधिसूचना या वर्षाच्या सुरूवातीस जाहीर करण्यात आल्या. भरतीसाठी 1 कोटी 15 लाख 67 हजार 248 उमेदवारांनी अर्ज केले आहेत.