- “टिकटॉक’च्या माध्यमातून धमकी
- माजी उपमहापौरांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप
पिंपरी – राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर डब्बू ऊर्फ हिरानंद आसवानी यांच्या हत्येचा कट रचण्यात आला. याप्रकरणी आरपीआयच्या पिंपरी चिंचवड शहाराध्यक्षाला पिंपरी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यास चार दिवसाची कोठडी सुनावली आहे.
सुरेश निकाळजे असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपी हा रिपब्लिकन पक्षाचा (आठवले गट) शहराध्यक्ष आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांच्या हत्येचा आरपीआयच्या शहाराध्यक्षाने कट रचला. याबाबत डब्बू आसवानी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता.
सुरुवातीला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर चौकशी केल्यावर त्यात गंभीर प्रकार असल्याचे दिसून आले. यामुळे पोलिसांनी न्यायालयाची परवागनी घेऊन अदखलपात्र गुन्ह्यामध्ये कलमवाढ करण्यात आली. त्यानंतर बुधवारी पोलसांनी मोठा फौजफाटा घेऊन पिंपरीतील मिलिंदनगरमध्ये जाऊन निकाळजे याला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे याबाबत अधिक तपास करीत आहेत.
टिकटॉकमुळे उघडकीस आला प्रकार
आरपीआय (आठवले गट) शहराध्यक्ष सुरेश निकाळजे याने दोन टिकटॉक व्हिडिओ तयार केले आहेत. त्यामध्ये निवडणूक 2019 मध्ये झालेल्या मारहाणीचा हिशोब होणार असल्याची भाषा या टिकटॉक व्हिडिओमध्ये केली आहे. हाच व्हिडिओ आता पुरावा म्हणून वापरण्यात येणार असल्याचे समजते. मात्र या गुन्ह्याविषयक अधिक माहिती देण्यास पिंपरी पोलीस टाळाटाळ करीत आहेत.