“ज्युबिलंट’ समोर आज आरपीआयचे आंदोलन

बेकायदेशीर आंदोलनात सहभागी होऊ नये : पोलिसांचे आवाहन

नीरा – पुरंदर आणि बारामती तालुक्‍याच्या सीमेवर असलेल्या निरा, निंबूत गावातील ज्युबिलंट लाइफ सायन्सस कंपनीत चार महिन्यांपूर्वी झालेल्या वायुगळती प्रकरणी अद्यापही कोणावर गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच, कंपनी पुन्हा सुरू करण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिली आहे. यामुळे पुरंदर रिपब्लिकन पार्टीच्या वतीने बुधवारी (दि.11) आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र, या आंदोलनाला गणेश विसर्जन व मोहरमचे कारण देत प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका कार्याध्यक्ष पंकज धिवार यांनी प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त करीत काही झाले तरी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

पुरंदर-दौंड प्रांताधिकाऱ्यांनी प्रमुख आंदोलकाविरोधात तडीपारीची नोटीस काढली आहे. यामुळे आंदोलकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्याच बरोबर पोलीस प्रशासन हे कंपनी प्रशासनाशी हातमिळवणी करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पंकज धिवार यांनी केला आहे. परंतु, काही झाले तरी आंदोलन करणारच, असा इशाराही त्यांनी दिला आहे. स्थानिक नागरिकांचा व ग्रामपंचायतींचा विरोध असतानाही शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी आर्थिक हितसंबंधाच्या जोरावर कंपनीला वेगवेगळे परवानगी घेऊन लोकांच्या जीवाशी खेळण्याचा एक प्रकारे परवाना दिला आहे.

मात्र, आता असा अन्याय सहन न करता या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. त्यामुळे उद्या काही होऊ आम्ही आंदोलन करणारच आहोत. लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणार असून आम्हाला घटनेने दिलेला तो अधिकार आहे, तो आम्ही वापरणारच असे धिवार यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

बाहेरच्यांनी येथे येऊन वातावरण बिघडवू नये….
कंपनी विरोधातल्या या आंदोलनाला कंपनीचे कामगार नेते व स्थानिक नेते यांच्याकडूनही विरोध आहे. अपघातानंतर जखमी व मृतांच्या नातेवाईकांना कंपनीच्या वतीने योग्य तो मोबदला देण्यात आला आहे, त्यामुळे त्यांनी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. याच बरोबर निंबुत ग्रामपंचायतच्या वतीनेही कंपनीला वेळोवेळी पत्र देऊन योग्य दक्षता घेण्यासाठी सांगितले आहे. येथील वातावरण आता शांत असून बाहेरून आलेल्या लोकांनी या ठिकाणचा कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन ज्युबिलंट कामगार युनियनचे अध्यक्ष व शेतकरी कृती समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी केले आहे.

आरपीआयच्या या आंदोलनाला प्रांताधिकारी यांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे उद्याच्या होणारे आंदोलन हे बेकायदेशीर असेल. या आंदोलनाला स्थानिकांचा पाठिंबा असल्याचे दिसत नाही. मात्र, तरीही लोकांनी या बेकायदेशीर आंदोलनात सहभागी होऊ नये. तसेच आंदोलकांनी संयम बाळगावा व हे आंदोलन पुढे ढकलण्यात यावे.
– अंकुश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक, जेजुरी पोलीस स्टेशन

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×