वाठार स्टेशन – वाठार स्टेशनमध्ये दि. 6 रोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. वाठार स्टेशन येथील मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त तळबीड येथील हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळावरून शिवज्योत आणली होती. ही शिवज्योत वाठार स्टेशनला पोहोचण्यापूर्वीच शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी वाठार स्टेशन शिवमय केले होते. सर्व गावात तसेच स्टेशनवर भगवे झेंडे पडकताना दिसत होते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
मावळ्यांच्या शिवज्योतीचे वाठार स्टेशनमध्ये आगमन झाल्या झाल्या “जय भवानी-जय शिवाजी’चा जयघोष झाला. फटाक्यांच्या आतषबाजीने रथात ठेवलेल्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे व शिव ज्योतीचे स्वागत केले. तसेच “भवानी तांडव’कराड येथून आणलेल्या ढोल पथकाद्वारे शिव ज्योतीची मिरवणूक वाजत-गाजत गाव व स्टेशनमधून फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात आली. भवानी तांडव कराड या ढोल पथकांमध्ये एकूण 100 जणांचा समावेश असल्यामुळे व त्यामध्ये खास करून ढोल पथकात मुलींचा जास्तीत जास्त सहभाग होता. त्यामुळे ही मिरवणूक शाही मिरवणूक असल्यासारखी भासत होती.
मिरवणूक पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ, वाठार स्टेशनमधील ग्रामस्थ व महिला यांनी रोडच्या दुतर्फा गर्दी केली होती. जय भवानी-जय शिवाजी’च्या गजरात मिरवणूक हळूहळू पुढे पुढे सरकत होती. तसेच शिवाजी महाराजांची मूर्ती सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये आणण्यात आली होती. शिवज्योतीच्या मिरवणुकीची सांगता वाठार पोलीस स्टेशनचे सपोनि मारुती खेडकर यांच्या हस्ते आरती करून करण्यात आली. मिरवणुकीत वाठार स्टेशन व वाठार गावातील हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. शिवजयंतीच्या कार्यक्रमात मुस्लिम कार्यकर्तेही सहभागी झाले होते. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार राहुल कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच होमगार्ड यांनीसुद्धा चोख बंदोबस्त ठेवला होता.