राजस्थानला ‘प्लेऑफ’ची आशा; रॉयल चॅलेंजर बंगळुरुशी होणार आज लढत

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू Vs राजस्थान रॉयल्स

वेळ – रा. 8.00 वा.
स्थळ – एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू

बंगळुरु  -दोन सामन्यात शानदार विजय मिळविल्यानंतर राजस्थान रॉयल्स मंगळवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात विजयाची हॅट्ट्रिक करत “प्ले ऑफ’मधील आशा कायम ठेवण्याच्या इराद्याने राजस्थान रॉयल्सचा संघ मैदानात उतरणार आहे.

राजस्थानचा कर्णधार स्टिव स्मिथ याचा हा अखेरचा सामना ठरणार आहे. या सामन्यानंतर तो विश्‍वचषक स्पर्धेसाठी मायदेशी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. दरम्यान, स्मिथकडे नेतृत्त्व सोपविल्यापासून संघाने चांगले प्रदर्शन केले आहे. गतसामन्यात त्यांनी सनरायर्जस हैदराबादचा पराभव केला होता. जॉस बटलर, जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्‍स यांच्या अनुपस्थितीतही संघ चांगली कामगिरी करत आहे. तसेच जयदेव उनादकटही फॉर्मात आल्याने संघाचा आत्मविश्‍वास वाढलेला आहे.

दुसरीकडे विराट कोहली यांच्या नेतृत्वाखालील बंगळुरु संघाच्या “प्ले ऑफ’मधील आशा संपुष्टात आल्या आहेत. गतसामन्यात त्यांना दिल्ली कॅपिटल्सकडून 16 धावांनी पराभव पत्कारावा लागला होता. या पराभवानंतर अन्य सामन्यात सकारात्मक खेळ करणार असल्याचे कर्णधार विराट कोहली याने सांगितले होते.

या सामन्यात संघाला एबी डिव्हिलियर्स आणि कोहलीकडून मोठया खेळीची अपेक्षा आहे. या दोघांनी क्रमशः 431 आणि 423 धावा केल्या आहेत. तर संघातील दोन्ही प्रमुख गोलंदाज अपयशी ठरल्याने युजवेंद्र चहलवरच गोलंदाजीची भिस्त राहणार आहे. या सामन्यात उमेश यादवच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज कुलवंत खेजरोलिया, हेन्‍रिक क्‍लासिनच्या स्थानी शिमरॉन हेटमायरला संधी देण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्स 12 सामन्यात पाच विजय मिळवित 10 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. तर बंगळुरु 12 सामन्यात 4 विजय आणि 8 पराभवानंतर 8 गुणांसह खालच्या क्रमांकावर आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.