दुबई – रॉयल चॅलेंजर बेंगळुरू (आरसीबी) संघाचा धडाकेबाज फलंदाज एबी डीविलियर्स याने सराव सामन्यात आक्रमक शतकी खेळी केली. या खेळीच्या जोरावर त्याने यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील उर्वरित लढतींत सहभागी होत असलेल्या संघांना धोक्याचा इशाराच दिला आहे. अमिरातीमध्ये येत्या रविवारपासून आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना प्रारंभ होत आहे.
या स्पर्धेसाठी सर्व संघ अमिरातीत दाखल झाले असून सर्व संघांचा सराव सुरू झाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी रद्द झाल्यावर लगेचच भारतीय क्रिकेटपटू देखील अमिरातीत पोहोचले आहेत.
आरसीबीचा संघही सामन्यांचा सराव करत असून त्यातील एका लढतीत डीविलियर्सने शतक फटकावले. या सराव सामन्यात डीविलियर्सने केवळ 46 चेंडूत 10 षटकार आणि 7 चौकारांसह 104 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने पहिल्या 19 चेंडूत 19 धावाच केल्या होत्या. त्यानंतर मात्र त्याने मैदानावर वादळ निर्माण केले. डीविलियर्ससह अन्य सहकारी खेळाडूंपैकी के. एस. भरतनेही 95 धावांची खेळी केली. देवदत्त इलेव्हन व हर्शल्स इलेव्हन असे दोन संघ तयार करत हा सामना खेळवला गेला.
आरसीबीच्या जर्सीचीच चर्चा
रॉयल चॅलेंजर बेंगळुरू (आरसीबी) संघातील सर्व खेळाडूंनी नुकत्याच अनावरण केलेल्या जर्सीचीही चर्चा रंगू लागली आहे. आयपीएलच्या दुसऱ्या सत्रासाठी कर्णधार विराट कोहली आणि कंपनी सज्ज झाली आहे. कोहलीच्या संघाच्या जर्सीचा रंग परंपरेनुसार लाल असतो यंदा मात्र, ते संपूर्ण स्पर्धेत निळी जर्सी परिधान करणार आहेत. मात्र, नंतरच्या काही लढतींसाठी ते पर्यावरण रक्षणाचा संदेश असलेली हिरवी जर्सी परिधान करून खेळणार आहेत.