दुबई –कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचेच किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात पारडे जड राहणार आहे.
सलामीच्या सामन्यात बेंगळुरूने विजय मिळवला होता तर, पंजाबला पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला होता. अर्थात असे असले तरीही बेंगळुरूचा संघ पाहिला तर पंजाबला या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर त्यांना कोहली, एबी डीविलियर्स, देवदत्त पडीक्कल व ऍरन फिंच यांना रोखावे लागेल. तसेच यजुवेंद्र चहल, नवदीप सैनी यांच्या गोलंदाजीला सामोरे जावे लागणार आहे.
सामन्याची वेळ : सायंकाळी : 7ः30 (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
ठिकाण : दुबई
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टसवर
पंजाबने पहिल्या सामन्यात विजयाची आशा निर्माण केली होती. मात्र, मयंक आग्रवाल बाद झाल्यानंतर त्यांना आवश्यक दोन धावाही काढता आल्या नव्हत्या. या सामन्यात त्यांना नितीन मेनन या पंचाने दिलेल्या एका चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. मात्र, त्यापूर्वी तळातील फलंदाजांनी जबाबदारीने खेळ केला असता तर सामना अखेरच्या षटकापर्यंत लांबलाच नसता.
कर्णधार लोकेश राहुल याच्यासह ग्लेन मॅक्सवेल, सर्फराज खान, करुण नायर व दीपक हुडा अशी तगडी फलंदाजी असूनही त्यांना पहिल्या लढतीत केवळ मयंक आग्रवालने तारले होते. हा सामना पंचांच्या चुकीमुळे सुपर ओव्हरमध्ये गेला होता. यातही पंजाबला विजय मिळवणे शक्य होते. मात्र, या सामन्यात भरात असलेल्या आग्रवालच्या जागी राहुलने आपल्यासह निकोलस पुरन याला फलंदाजीला आणले तेव्हाच त्यांचे गणित चुकले. त्यांना अपयशाचा सामना करावा लागला व दिल्ली कॅपिटल्सने हा सामना जिंकला होता. आता बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात त्यांना आपल्या फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही चमक दाखवावी लागणार आहे.