दुबई – ग्लेन मॅक्सवेलचे नाबाद अर्धशतक, श्रीकर भरत व कर्णधार विराट कोहलीची उपयुक्त फलंदाजी यांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. यासह बेंगळुरूने यंदाच्या आयपीएल स्पर्धेची प्ले ऑफ फेरी गाठण्याच्या आशा भक्कम केल्या.
राजस्थानने विजयासाठी दिलेल्या दीडशे धावांचा पाठलाग करताना बेंगळुरूने कोहली व देवदत्त पडीक्कलच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर धडाक्यात सुरुवात केली. पडीक्कल 22 धावांवर बाद झाल्यावर कोहलीही 25 धावांवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. त्याला रायन परागने थेट चेंडूफेक करत अफलातून बाद केले.
त्यानंतर मात्र भरत व मॅक्सवेल यांनी संघाचा डाव सावरला. भरत चांगला खेळत असताना अर्धशतक पूर्ण करण्यापूर्वीच बाद झाला. त्यानंतर मात्र मॅक्सवेलने आपले अर्धशतक 30 चेंडूत 6 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने थाटात पूर्ण केले व एबी डीविलियर्सच्या साथीत संघाचा विजय साकार केला.
राजस्थानकडून मुस्तफिजूर रेहमानने 2 गडी बाद केले. नवोदित वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने अखेरच्या षटकात घेतलेले तीन बळी तसेच त्याला सुरेख साथ देताना यजुवेंद्र चहल व शाहबाज अहमदने केलेली अचूक गोलंदाजी यांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा डाव 20 षटकांत 9 बाद 149 धावांवर रोखला. या सामन्यात राजस्थानने धडाक्यात प्रारंभ केला होता. मात्र, त्यानंतर बेंगळुरूच्या गोलंदाजांनी त्यांच्या प्रमुख फलंदाजांना स्वस्तात बाद करत सामन्यावर नियंत्रण राखले. राजस्थानचे सलामीवीर इव्हान लेविस व यशस्वी जयस्वाल यांनी संघाला आक्रमक सुरुवात करून देताना 77 धावांची सलामी दिली.
जयस्वाल 31 धावांवर बाद झाला. त्याने 22 चेंडूत 3 चौकार व 2 षटकार फटकावले. त्यानंतर लेविसने आपले अर्धशतक साकार केले. 58 धावांच्या या खेळीत त्याने 37 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 3 षटकार अशी आतषबाजी केली. मात्र, तोदेखील धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यानंतर गेल्या सामन्यातील अर्धशतकवीर कर्णधार संजू सॅमसनने सुरुवात चांगली केली. मात्र, त्याला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयश आले व तो 19 धावा काढून परतला. त्यानंतर ख्रिस मॉरीसचा 14 धावांच्या खेळीचा अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही.
संक्षिप्त धावफलक –
राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 9 बाद 149 धावा. (इव्हान लेविस 58, यशस्वी जयस्वाल 31, संजू सॅमसन 19, हर्षल पटेल 3-34, शाहबाज अहमद 2-10, यजुवेंद्र चहल 2-18).
रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 17.1 षटकांत 3 बाद 153 धावा. (विराट कोहली 25, देवदत्त पडीक्कल 22, श्रीकर भरत 44, ग्लेन मॅक्सवेल नाबाद 50, एबी डीविलियर्स नाबाद 4, मुस्तफिजूर रेहमान 2-20).