आबूधाबी – विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर बेंगळुरू व श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज होत असलेला सामना वर्चस्वाची लढाई अशा स्वरुपातच खेळला जाणार आहे. बेंगळुरूची बाजू काहीशी वरचढ असली तरीही दिल्लीला प्ले-ऑफमधील स्थानासाठी हा सामना जिंकणे अनिवार्य बनले आहे.
दोन्ही संघात अत्यंत आक्रमक फलंदाज असल्याने हा सामना याच फलंदाज विरुद्ध फलंदाज असाच रंगणार आहे. सांघिक फरक करायचा झाला तर बेंगळुरूच्या फलंदाजांनी साखळीतील अखेरच्या काही सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे. या उलट दिल्लीच्या भक्कम फलंदाजीला अपयशाचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे.
सुरुवातीच्या सामन्यांतील अपयशाला मागे टाकत बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली, एबी डीविलियर्स, देवदत्त पडीक्कल यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मात्र, त्यांना ऍरन फिंच व शुवम दुबे यांचे अपयश भोवले आहे. त्यांना आज विजय मिळवायचा असेल तर त्यांच्या पहिल्या पाच फलंदाजांना अत्यंत जबाबदारीने खेळावे लागणार आहे. त्यातही पडीक्कल, डीविलियर्स व कोहली यांनी डेथ ओव्हर्समध्ये किमान 12 ते 15 च्या सरासरीने धावा करणे महत्त्वाचे आहे.
बेंगळुरूची गोलंदाजी नवदीप सैनी व यजुवेंद्र चहल या दोनच गोलंदाजांवर अवलंबून आहे. त्यातही चहलचे वेगवान गुगली चेंडू अनेक संघांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. त्याला साथ देताना ऍडम झम्पा, इसुरू उदाना व वॉशिंग्टन सुंदर यांनी चांगली गोलंदाजी केली असली तरीही वेगवान गोलंदाज डेल स्टेनला म्हणावे तसे यश मिळालेले नाही.
पृथ्वी शॉ, शिखर धवन, शेमरन हेटमायर, मार्कस स्टोनिस व कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या फलंदाजीच्या जोरावर दिल्ली मोठी धावसंख्या उभारून कोहलीच्या संघावर दडपण राखण्याचा प्रयत्न करेल. हा सामना दिल्लीने गमावला तर त्यांना चौथ्या स्थानावर घसरण्याच्या धोका आहे व अशा स्थितीत त्यांना एलिमिनेटर नव्हे तर क्लालिफायरमध्ये खेळावे लागेल. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी कडवी लढत देण्याची शक्यता आहे.
दिल्लीची फलंदाजी बेंगळुरूइतकीच भक्कम असली तरीही त्यांची गोलंदाजी अनरिच नोर्जे व कागिसो रबाडा यांच्यावरच अवलंबून असल्याने त्यांना सेकंड बेंचमधील फिरकी गोलंदाजांचा पर्याय वापरुन पाहावा लागणार आहे. तसेच अनुभवी गोलंदाज रवीचंद्रन अश्विन याच्या गोलंदाजीचा सामना करणे बेंगळुरूच्या कोहली वगळता अन्य फलंदाजांसमोर आव्हान राहिल.
ख्रिस मॅरिस निर्णायक ठरेल..
यंदाच्या स्पर्धेत कागिसो रबाडा याच्या तोडीसतोड अचुक गोलंदाजी ख्रिस मॅरिसने केली आहे. त्याला सातत्याने बळी घेण्यात जरी अपयश आले असले तरीही त्याने अत्यंत खिफायती गोलंदाजी केली आहे. दिल्लीच्या फलंदाजांवर वर्चस्व राखण्यासाठी बेंगळुरूला त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.