22 वी सब-ज्युनियर राष्ट्रीय रोइंग चॅम्पियनशिप स्पर्धा
पुणे – महाराष्ट्राच्या मृण्मयी साळगावकर, सागर घुगे, निकीता दरेकर यांनी येथे होत असलेल्या भारतीय रोइंग फेडरेशनच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र रोइंग असोसिएशनच्या वतीने 22 व्या सब-ज्युनियर आणि चौथ्या आंतर राज्य चॅलेंजर्स स्प्रिंट राष्ट्रीय रोइंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याचबरोबर हिंमत पिंगळे-विजयकुमार ढगे, शविना बेगम-स्वेता मंडल, कोमल बोडके-भाग्यश्री चव्हाण या जोड्यांनीही आपापल्या प्रकारातून अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला.
कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंगच्या कॅम्पसमध्ये स्थित आर्मी रोइंग नोडमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. चॅलेंजर वूमन सिंगल स्कल्सच्या उपांत्य फेरीत मृण्मयी साळगावकरने 2 मिनिटे 10.40 सेकंद वेळ नोंदवून दुसरे स्थान पटकावले. अंतिम फेरीत मृण्मयीला सुवर्णपदकासाठी आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. या फेरीत तिच्यासमोर मध्य प्रदेशच्या अंशिका भारती, केरळची जेस्ना सी.,बिहारची सुरुचीकुमारीचे आव्हान असेल. चॅलेंजर वूमन डबल स्कल्सच्या उपांत्य फेरीत शवीना बेगम-श्वेता मंडल 2 मिनिटे 05.46 सेकंद वेळ नोंदवून दुसरे स्थान मिळवले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
चॅलेंजर वूमन पेअरच्या उपांत्य फेरीत कोमल बोडके-भाग्यश्री चव्हाण या जोडीने 2 मिनिटे 04.76 सेकंद वेळ नोंदवून पहिला क्रमांक पटकावला. महाराष्ट्राचे प्रशिक्षक विकल सार्वे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा संघ स्पर्धेत सहभागी झाला आहे. चॅलेंजर मेन सिंगल स्कल्सच्या अंतिम फेरीत सागर घुगेने 1 मिनिट 47.03 सेकंद वेळ नोंदवून पहिला क्रमांक पटकावला.
सागरला अंतिम फेरीत सुवर्णपदकाची संधी आहे. चॅलेंजर मेन पेअरच्या उपांत्य फेरीत हिंमत पिंगळे-विजयकुमार ढगे या जोडीने 1 मिनिट 46.86 सेकं द वेळ नोंदवून दुसरे स्थान मिळवले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. आता या जोडीसमोर पंजाब, मध्य प्रदेश, झारखंड या जोड्यांचे आव्हान असेल. चॅलेंजर मेन डबल स्कल्सच्या उपांत्य फेरीत पंकज वाड-सागर राऊत या जोडीने 1 मिनिटे 45.18 सेकंद वेळ नोंदवून चौथ्या स्थानावर राहिले. त्यामुळे त्यांना अंतिम फेरी गाठता आली नाही.
सब-ज्युनियर गर्ल्स सिंगल स्कल्सच्या उपांत्य फेरीत निकीता दरेकरने 2 मिनिटे 19.85 सेकंद वेळ नोंदवून दुसरे स्थान पटकावले. अंतिम फेरीत तिच्यासमोर तेलंगणची बी. हेमलता, पश्चिम बंगालची डी. पॉल, केरळची मरियन बेलिंडा यांचे आव्हान असेल. सब-ज्युनियर बॉइज कॉकलेक्स फोरच्या उपांत्य फेरीत प्रज्वल व्यवहारे, सिद्धार्थ व्यवहारे, अर्जुन शिंदे, दर्शन गवळी यांनी 1 मिनिट 59.05 सेकंद वेळ नोंदवून चौथे स्थान पटकावले. सब-ज्युनियर बॉइज सिंगल स्कल्सच्या उपांत्य फेरीत स्वराज आघवने 2 मि. 09.37 सेकंद वेळ नोंदवून चौथे स्थान पटकावले. त्यामुळे अंतिम फेरीत त्याला प्रवेश करता आला नाही.