रावडी खुर्दमध्ये दोन गटात हाणामारी

सोळा जणांवर गुन्हा दाखल

लोणंद – 
रावडी खुर्द, ता. फलटण येथील दोन गटात किरकोळ कारणावरून गज, काठी, दगड, लाथा, बुक्‍या, दांडकी, आदीच्या सहाय्याने झालेल्या मारहाणीत चौघेजण जखमी झाले. लोणंद पोलीस स्टेशनमध्ये दोन्हीकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून दोन्ही गटाच्या सोळा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सोमनाथ राणे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार दि. 10 रोजी सकाळी 10.30 वाजताच सुमारास मी पत्नीसह आमच्या पोल्ट्रीकडे जात होतो.

यावेळी आमचे शेजारी प्रविण कर्चे, दिपक कर्चे, मालन कर्चे, अक्षय खाडकर यांच्यासोबत पोल्ट्रीवर जायचे नाही असे सांगितल्याने वाद झाला होता. त्यामुळे आम्ही लोणंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर सायंकाळी 7 च्या सुमारास गुरांच्या शेडमध्ये गेलो. त्यावेळी तेथे प्रविण कर्चे, अक्षय खांडेकर रा. रावडी, छाया लोणारी, प्रशांत लोणारी रा. बारामती, रेखा होळकर, अमर होळकर, सविता खांडेकर रा. चौधरवाडी, मनोज हिप्परकर रा. मलटण, दिग्विजय होळकर, आरती गळवे दोन्ही रा. पुणे यांनी येऊन आमचे विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केल्याच्या कारणावरून लोखंडी गज, दांडके व चेनने मारहाण केली.

रावडी खुर्द येथील प्रवीण कर्चे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 11 रोजी दुपारी दुपारी एकच्या सुमारास माझा भाऊ दीपक कर्चे यास मच्छिंद्र राणे, रामचंद्र राणे, सुनील राणे, प्रशांत कारंडे, सोमनाथ राणे यांनी दोन्ही हातास, पाठीवर व पोटात तोंडावर हाताने काठीने मारहाण केली मला सायंकाळी घरासमोर मच्छिंद्र राणे, रामचंद्र राणे सुनील राणे, सोमनाथ राणे, किरण राणे, शारदाबाई राणे सर्व रा. रावडी खु।। व प्रशांत कारंडे व त्याचे इतर 2 मित्र रा. होळ, ता. बारामती यांनी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच मला व भाचा प्रशांत हिप्परकरला दगड, काठी, हाताने मारहाण करून जखमी केले. लोणंद पोलिसांनी दोन्ही फिर्यादी नुसार 16 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तपास पोलीस उपनिरिक्षक कदम करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.