कोल्हापूर – मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर प्रलंबित प्रश्नांबाबत 19 ऑगस्टला पुण्यात गोलमेज परिषद आयोजित केली आहे. परिषदेसाठी महाराष्ट्रातील सर्व संघटनांना निमंत्रित केले जाणार आहे. अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील व मराठा आरक्षण समन्वय समितीचे विजयसिंह महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
महाराष्ट्रात 58 मूक मोर्चे काढले. राज्यशासनाबरोबर अनेक वेळा बैठका केल्या. त्या माध्यमातून मराठा समाजाचे काही प्रश्न सोडवण्यात यश आले. परंतु काही मागण्या सोडवण्यासाठी कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे. यासाठीच पुण्यात राज्यातील सर्व मराठा समाजातील संघटनांना एकत्र करून गोलमेज परिषद आयोजित केलेली आहे.
सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारची भूमिका व संघर्ष समितीची जबाबदारी धोरण निश्चिती.
सारथी संस्थेसाठी 500 कोटीची आर्थिक तरतूद, आरक्षणाच्या आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासनाकडून नोकरी,राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये मराठा विध्यार्थ्यांसाठी वसतिगृह, शिवस्मारकाचे काम तातडीने चालू करणे, कोपर्डी प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा आणि राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगच्या शिफारसी लागू करण्याच्या मागण्यांसाठी या परिषदेत चर्चा होणार आहे.