हॅमिल्टन – न्यूझीलंडचा प्रमुख फलंदाज रॉस येलर याने नेदरलॅंड्सविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना खेळताना आपल्या कारकीर्दीची साश्र नयनांनी अखेर केली. या सामन्यापूर्वीच त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला होता. सामना सुरु होण्यापूर्वी तो अन्य खेळाडूंसह मैदानात आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित होता व देशाचे राष्ट्रगीत सुरु झाल्यावर त्याला आपले अश्रु लपवता आले नाहीत.
बांगलादेशविरुद्ध जानेवारीमध्ये खेळलेल्या कसोटी कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यातही टेलरने गोलंदाजी केली आणि बळी घेण्यात यशही मिळवले. त्याने 236 एकदिवसीय सामने खेळताना 21 शतके व 51 अर्धशतके फटकावताना 8 हजार 607 धावा केल्या आहेत. त्याने 2006 साली वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. टेलर हा न्यूझीलंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 19 शतके व 35 अर्धशतके यांच्या जोरावर 7 हजार 584 धावा केल्या आहेत. त्यात तीन द्विशतकांचा समावेश आहे. टेलरने आयपीएलच्या 55 सामन्यांमध्ये 1 हजार 17 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांत 72 वेळा 50 पेक्षा जास्त धावा करणारा टेलर न्यूझीलंडचा पहिलाच फलंदाज आहे.
न्यूझीलंड आणि नेदरलॅंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना हॅमिल्टन येथे खेळवला गेला. तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात 100 सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने 292 टी-20 सामन्यांमध्ये 6 हजार 429 धावा केल्या आहेत.