पिंपरी – गेल्या दोन वर्षांत करोनामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसलेल्या आर्थिक फटक्यामुळे उत्पादकांची संख्या 30 ते 35 टक्के कमी झाली आहे. हवामानातील बदलामुळे उत्पादनही घटले. त्याचा फुलांच्या वाढीवरही परिणाम झाला आहे. स्थानिक बाजारपेठेत मागणी व रास्त भाव मिळत असला. तरी, विदेशी व संभाव्य ग्राहक टिकून ठेवण्यासाठी फुलांची निर्यात करावी असा शेतकऱ्यांचा कल असतो. देश, विदेशात सततची वाढती मागणी असल्याने पिंपरी व पुणे फुल बाजारात अत्यंत कमी आवक होत आहे.
सहा दिवसांवर येऊन ठेपलेला व्हॅलेंटाइन डे तसेच लग्नसराई सुरू असल्याने सध्या फुलांना मोठी मागणी आहे. निर्यातीपेक्षा स्थानिक बाजारपेठेत दर अधिक मिळत आहे. सध्या पुणे, अहमदाबाद, सुरत, भोपाळ, मुंबई, दिल्ली, जयपूर, लुधियाना, आदी शहरांत मोठ्या प्रमाणावर फुले जात आहेत.
परदेशात लाल गुलाबाच्या एका फुलाला 13 ते 14 रुपये दर मिळत आहे. तर स्थानिक बाजारपेठेत लाल गुलाबाच्या एका फुलाला 17 ते 18 रुपये तर गुलाबी, नारंगी, पिवळा, पांढरा आदी रंगाच्या गुलाब फुलाला 20 ते 21 रुपये दर मिळत आहे.
साधारणतः 100 ते 150 रुपयांना मिळणारा लाल गुलाबाची 20 फुलांची गड्डी 300 ते 330 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर रंगीत म्हणजे गुलाबी पिवळा व पांढरा गुलाब 400 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ही भाववाढ विक्रमी आहे. प्रचंड भाववाढ असल्याने फुलांच्या विक्रीत अडचण येत आहे.
व्हॅलेंटाइन डे जवळ आल्यामुळे फुलांच्या किमतीत चांगलीच वाढ होत असल्याचे दिसत आहे. तसेच एक फेब्रुवारीपासून गुलाबाची फुले मावळ तालुक्यातून बाहेरील देशात पाठवणे सुरू झाले आहे. परंतु फुलांना बाहेरील देशात मोठी मागणी आहे मागणी जास्त आहे व पुरवठा कमी असल्या कारणाने सध्या कार्यरत असलेल्या फूल उत्पादकांना यंदाचा हंगाम हा फायदेशीर ठरणार असल्याचे दिसते.