पुस्तक परीक्षण: “रोझलिंड फ्रॅंकलिन’ द डार्क लेडी ऑफ डीएनए

माधुरी तळवलकर
प्रगत समजल्या जाणाऱ्या अमेरिकेत काय किंवा युरोपीय देशात काय, स्त्रियांसाठी उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडले गेले तरी गणित आणि भौतिकी या विज्ञान क्षेत्रात “पुरुषवर्गाची’च मक्‍तेदारी होती. समाजाकडून स्त्रियांसाठी निषिद्ध ठरवलेल्या या क्षेत्रात शिरकाव करून, स्वतःला शास्त्रज्ञ म्हणून सिद्ध करण्यासाठी स्त्रियांना अथक मेहनत घ्यावी लागली. प्रसंगी प्रयोगशाळांतून विनावेतन काम करून आपलं संशोधन चालू ठेवावं लागलं. योग्यता असूनही दुय्यम दर्जाची पदं स्वीकारावी लागली. अनेकींच्या बाबतीत तर त्यांचं संशोधन त्यांच्या मालकीचं न ठरता त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांच्या किंवा विभाग प्रमुखांच्या मालकीचं ठरलं. त्यामुळे काहीजणी उच्च श्रेणीच्या पुरस्कारांना मुकल्या.

रोझलिंड फ्रॅंकलिन ही शास्त्रज्ञही अशा काही स्त्रियांपैकी एक शास्त्रज्ञ होती. वीणा गवाणकर यांनी “रोझलिंड फ्रॅंकलिन’ द डार्क लेडी ऑफ डीएनए या पुस्तकात तिच्या संपूर्ण संशोधनाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. विज्ञाननिष्ठा आणि कार्यनिष्ठा हे रोझलिंडचे प्रमुख गुणविशेष होते. तिला फक्‍त 37 वर्षाचं आयुष्य लाभलं. पण इतक्‍या लहान कालावधीत अनेक संकटांवर मात करीत तिनं आश्‍चर्यकारक कामगिरी करून दाखवली. अवघ्या 25व्या वर्षी कोळशाच्या घनतेविषयीचं रोझलिंडचं संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचलं. त्यानंतर डीएनए तंतूची अत्यंत सुस्पष्ट आणि ठसठशीत ठळक एक्‍स रे डिफ्रॅक्‍शन प्रतिमा प्रथमच सादर करण्याचं यश रोझलिंडला लाभलं. डीएनए रेणूच्या त्रिमितीचा अंदाज देणारे तिने पुरावे मिळवले. या तिच्या संशोधनाचं फलित तिच्या नकळत वापरून, क्रीक आणि वॉट्‌सन यांनी आपले संशोधन प्रसिद्ध केले. या संदर्भात वीणा गवाणकर लिहितात, पुरुषांच्या प्रयोगशाळेत स्त्रीचं संशोधन पुरुषांच्या मालकीचं असतं. वॉट्‌सन-क्रीकनी रोझलिंडचं संशोधन वापलं नसतं तर विल्किन्स (तिचा सहकारी) आणि रॅन्डॉल (संस्थाप्रमुख) यांनी वापरलं असतंच.

त्यानंतर रोझलिंडने टीएमव्ही म्हणजे टोबॅको मोझाइक व्हायरस यावर संशोधन केले. त्यासंबंधी तिनं तयार केलेलं मॉडेल अनेक वैज्ञानिक प्रदर्शनात मांडण्यासाठी मागितले जाऊ लागले. एकमेकांशी चर्चा करून पुरुष शास्त्रज्ञ आपल्या संशोधनातील अडचणी सोडवत असताना रोझलिंडला मात्र फक्‍त स्वतःच्या प्रयोगसिद्ध निष्कर्षांवर विसंबून राहावं लागत असे. तिचं संशोधनातलं सातत्य, स्वतःला प्रयोगशाळेत गाडून घेणं, तिच्या कामाचा झपाटा तिच्या सहकाऱ्यांना थक्‍क करी. तिने कार्बन, डीएनए आणि विषाणू या विषयांवर एकूण 37 विज्ञानलेख सादर केले. ते सर्वच लेख विज्ञानक्षेत्रात मोलाचे मानले जातात.

दुर्दैवाने ओव्हेरियन कॅन्सरनं तिचा घास घेतला. मृत्यूनंतर मात्र तिला अनेक पुरस्कार मिळाले. 1859 पासून ते 1950 पर्यंतचे डीएनएच्या शोधप्रवासातले टप्पेही नोंदवले आहेत. 1951पासून रोझलिंडने त्यावरील संशोधन सुरू केले. रोझलिंडची प्रयोगशाळा, तिनं तयार केलेली मॉडेल्स अशी काही महत्त्वाची छायाचित्रे या पुस्तकात राजहंस प्रकाशनाने आवर्जून छापली आहेत. रोझलिंडच्या संशोधनाबरोबरच तिच्या व्यक्‍तिमत्त्वाचा शोध घेण्याचाही प्रयत्न लेखिकेने केला आहे. त्या काळच्या स्त्रियांना किती प्रकारच्या विरोधांना तोंड देऊन आपले संशोधनकार्य सिद्ध करावे लागत होते, याची कल्पना येते आणि म्हणूनच डाक्‍युमेंटेशनच्या दृष्टीने “रोझलिंड फ्रॅंकलिन’ची ही चरित्रगाथा महत्त्वाची ठरते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)