राजगुरूनगर – सध्या मुस्लीम बांधवांचे रमजान महिन्यातील उपवास सुरू आहे. यात राजगुरूनगर येथील लहान मुलांनी प्रथमच रोजे ठेऊन सर्वांना थक्क केले आहे. यात आलीम नदीम मोमीन (वय 7) व या बालकाने तीन दिवस झाले पूर्ण रोजे ठेवले आहे. त्यातच सध्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत असतानाही आलीम रोजे ठेवत असल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. रोजा ठेवताना पहाटे चार पूर्वी आहार घेण्यात येतो.
दैनंदिन व्यवहार, कामकाज सांभाळून कुठलाही आहार व पाणीदेखील न पिता रोजा ठेवला जातो. या कालावधीमध्ये पाचवेळा नमाज पठणासाठी व रोजा सोडण्यासाठी मशिदीमध्ये जातात. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे राजगुरूनगरातील मशीद बंद असल्याने मुस्लीम बांधव घरीच रोजा सोडत आहेत. तर संचारबंदी लागू असल्याने इफ्तार पार्टी कोठेही होत नाही.
रोजा सोडण्यासाठी मुस्लीम बांधव फळ आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ खरेदी करीत असतात याकाळात विविध खाद्यपदार्थ व फळांना मोठ्या प्रमाणात मागणी असते; मात्र, यंदा करोनाच्य पार्श्वभूमीवर जे मिळेल त्यात हे बांधव समाधान मानत असून देशावरील “करोना’चे सावट लवकरात लवकर टळू दे असे म्हणत घरूनच “नमाज’ पठण मुस्लीम बांधव करीत आहेत.