पुणे – मालवाहतुकीसाठी भारतीय रेल्वेने “रो-रो’ सुरू केली आहे. या सेवेंतर्गत मध्य रेल्वेकडून रविवारी बाळे (सोलापूर) हून पहिली रेल्वे सोडली. याद्वारे ओपन रेल्वे वॅगनवर ट्रॅक चढवून त्यांची वाहतूक करण्यात येते.
मालवाहतूक जलद, सुरळीत आणि विनाअडथळा होण्याच्या अनुषंगाने “रोल-ऑन-रोल-ऑफ’ (रोरो) सेवा सुरू केली आहे. पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातदेखील याबाबतची कल्पना मांडली होती. 30 ऑगस्ट रोजी पहिल्या “रोरो’ सेवेला हिरवा झेंडा दाखवला होता. 1999 मध्ये कोकण रेल्वेने पहिल्यांदा “रोरो’ सेवा सुरू केली होती. एप्रिल 2020 मध्ये बाळे आणि नेलेमंगळा या शहरांना जोडणारी “रोरो’ वाहतूक सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाने परवानगी दिली होती.
रविवारी बाळे (सोलापूर) ते नेलेमंगळा (बेंगळुरु) दरम्यान “रोल-ऑन-रोल-ऑफ’ (रोरो) सेवा ओपन फ्लॅट रेल्वे वॅगनवर चालविली. मध्यम ते मोठ्या प्रमाणातील मालवाहतूक त्रासमुक्त आणि पर्यावरणास अनुकूल होण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.
असे होतील फायदे
– रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी
– इंधन बचत
– कार्बन फूटप्रिंटमध्ये घट
– मालवाहतुकीच्या खर्चात बचत
– नाशवंत पदार्थांची जलद वाहतूक