अजिंक्‍यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी “रोप वे’

उदयनराजे भोसले; लवकर उभारण्यासाठी सर्व ते प्रयत्न करणार

सातारा  -अजिंक्‍यतारा किल्ला महाराष्ट्राची अस्मिता आहे. याच किल्ल्यावरून मराठा साम्राज्याचा राज्यकारभार पाहिला जात होता. त्यामुळेच या अजिंक्‍यतारा किल्ल्यास एक वेगळे वैभव प्राप्त झाले. ज्येष्ठांसह सर्वांसाठी उपयुक्त म्हणून किल्ले अजिंक्‍यतारा ते पायथा असा रोप वे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 

यासाठी आवश्‍यक आराखडे, अंदाजपत्रक, पुरातत्व खात्यासह विविध परवानग्या घेऊन लवकरच हा रोप वे साकारला जाईल, अशी हमी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज दिली.

किल्ले अजिंक्‍यताऱ्यावर जाण्यासाठी रोप वे उभारण्यासाठी उदयनराजे भोसले यांनी “एसजी एफआरएल’ या कंपनीच्या तज्ज्ञांसह किल्ले अजिंक्‍यतारा आणि परिसराची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, ऍड. डी.जी. बनकर आदी प्रमुख उपस्थित होते. अजिंक्‍यतारा किल्ला आता सातारा नगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाला आहे. हा किल्ला मराठा साम्राज्याचा आणि शाहूनगरवासीयांसह

महाराष्ट्रीय व्यक्‍तींची अस्मिता आहे. या किल्यावर ऐतिहासिक राजसदर, श्री मंगळाई मंदिर, दक्षिणाभिमुखी मारुती मंदिर यांसह सुमारे सात जिवंत पाण्याची तळी, ऐतिहासिक दक्षिण दरवाजा आदी प्रमुख ठिकाणे आणि ओळखीच्या खुणा इतिहासप्रेमींसह भाविक, पर्यटकांना आकर्षित करीत असतात.

नवरात्रात सायंकाळपर्यंत भाविकांचा ओघ सुरुच असतो. जागतिक वारसास्थळ कास पठार, महाबळेश्‍वर, पाचगणी ही पर्यटनस्थळे जिल्हयाचा आत्मा आहे. या पार्श्‍वभूमीवर ऐतिहासिक सातारचाही पर्यटनाच्या दृष्टीने विकास घडवून, आर्थिक चक्राला गती देणे असे मुख्य उदिष्ट आहे. त्याकरीताच किल्ले अजिंक्‍यतारा ते पायथा असा रोप वे उभारण्याचे निर्णय घेतला. रोप वे करीता लागेल ते सर्व प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

चार भिंती ते किल्ले अजिंक्‍यतारा असा एक रोपवे मार्ग तसेच अजिंक्‍यतारा ते पेरेन्ट स्कूलची पिछाडी असा एक मार्ग होऊ शकतो आणि अजिंक्‍यतारा ते उंटाचा डोंगर असा एक मार्ग होऊ शकता,े असे सर्वेक्षणाअंती निश्‍चित करण्यात आले आहे. हे तिन्ही मार्ग साधारण दोन किलोमीटर हवाई अंतराचे आहेत.

यापैकी भविष्यकालीन दृष्टीकोनामधून सुलभ ठरेल त्या मार्गावर रोप वे उभारण्याचे ठरवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी आबासाहेब इंगळे, ऍड. विनित पाटील, नगरसेविका सौ. स्नेहा नलवडे, सौ. सीता हादगे, शशिकांत जाधव आदी उपस्थित होते.

केंद्र व राज्याकडून निधी मिळवणार
रोप वे उभारण्याकामी अंदाजपत्रक आणि आराखडे तयार करण्याच्या आणि पुरातत्व खात्यासह रोप वे उभारण्याबाबत लागणाऱ्या विविध परवानग्या आदींबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत.

केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. लवकरच किल्ले अजिंक्‍यताऱ्यावर जाणे व येण्यासाठी सुयोग्य ठिकाणी रोप वे उभारणीचे नियोजन पूर्ण करण्याची ग्वाही उदयनराजे भोसले यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.