खंडोबाचे मुळस्थान; भाविकांची पायपीट टळणार
धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिली माहिती
लहान मुले, वयोवृद्ध भाविकांना मिळणार दिलासा
सागर येवले
पुणे- जेजुरीतील श्री खंडोबाचे मुळस्थान असलेल्या कडेपठरावर (कऱ्हेपठार) आता “रोपवे’च्या सहाय्याने जाता येणार आहे. सह धर्मादाय आयुक्त कार्यालय पुणे आणि जेजुरी देवस्थानकडून त्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, इच्छुक कंपन्यांकडून प्रकल्प अहवाल मागविण्यात आला आहे. त्यामुळे वयोमान किंवा आजारपणामुळे अडचणीची ठरणारी कडेपठरावर जाण्याची भाविकांची इच्छा आता पूर्ण होणार आहे.
सोमवती अमावस्या, सण आणि उत्सवानिमित्त दरवर्षी जेजुरी गडावर खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भावीक येत असतात. परंतु, खंडोबाचे मुळ स्थान असलेले कडेपठार उंचीवर असल्याने लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती आणि आजारपणामुळे भाविकांना कडेपठारावर जाणे शक्य होत नाही. कारण, कडेपठार हे समुद्रसपाटीपासून साधारण 900 मीटर उंच असून, याठिकाणी जाण्यासाठी पूर्वी छोटी पायवाट होती. मात्र, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता लोकनिधीतून याठिकाणी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. पायी जायाचे म्हटले तरी साधारण दीड किलोमीटरचा हा प्रवास आहे. जेजुरीतील श्री खंडोबा देवस्थानच्या ठिकाणी वर्षभरात अंदाजे 8 लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. मार्गशीष महिन्यातील चंपाषष्ठी उत्सव, सोमवारी अमावस्या, चैत्र, माघ आणि पौष पोर्णिमा, नवरात्री आणि दसरा हे सण कडेपठारावर मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्याठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविक असतात.
श्री खंडोबा हे भाविकांचे आराध्यदैवत, कुलदैवत आणि काही भाविक पर्यटनासाठी याठिकाणी येतात. त्यामध्ये लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती आणि आजारपणामुळे भाविक कडेपठाराच्या खाली असलेल्या मंदिरामध्येच जावून दर्शन घेतात. त्यांना कडेपठारावर जाणे शक्य होत नाही. त्यामुळे धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि जेजुरी देवस्थानकडून जेजुरी गाव पायथा ते कडेपठार’ असा रोपवे’ करण्यात येत आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.
“एल’ आकारात असणार रोपवे’
एल’ आकारामध्ये हा रोपवे’ असणार असून, त्यासाठी संबंधित कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यासाठी जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर निविदा, टेंन्डर, वर्क ऑर्डर यासह पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सह धर्मादाय आयुक्त देशमुख यांनी सांगितले.