#ENGvNZ 2nd Test : रूटचे व्दिशतक; इंग्लंडला पहिल्या डावात आघाडी

 हॅमिल्टन : न्यूझीलंडला मालिकेतील दुस-या कसोटीमध्ये पहिल्या डावात ३७५ धावांवर रोखल्यानंतर प्रत्युत्तरात इंग्लंडने जो रूटच्या शानदार व्दिशतकी आणि राॅरी बर्न्सच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ४७६ धावापर्यंत मजल मारत १०१ धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने दुस-या डावात फलंदाजीस सुरूवात केली असून चौथ्या दिवसअखेर २ बाद ९६ धावा काढल्या असून ते अजूनही ५ धावांनी पिछाडीवर आहेत.

कालच्या ५ बाद २६९ धावसंख्येवरून पुढे खेळताना इंग्लंडने सहावी विकेट आॅली पोपच्या रूपात गमावली. पोप आणि रूटने सहाव्या विकेटसाठी १९३ धावांची भागीदारी केली. आॅली पोपला नील वॅगनरने जीत रावलकरवी ७५ धावांवर बाद केले. त्यानंतर लगेचच मिचेल सैंटनरने निकोल्सकरवी जो रूटला झेलबाद केले. जो रूटने ४४१ चेंडूत २२ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २२६ धावा केल्या. जो रूटने कसोटी कारकीर्दितील तिसरे व्दिशतक पूर्ण केलं. रूटनंतर इंग्लंडचा एकही फलंदाज मैदानावर तग धरू शकला नाही. क्रिस वोक्स ०, जोफ्रा आर्चर ८ आणि स्टअर्ट ब्राॅड शून्यावर बाद झाले आणि इंग्लंडचा पहिला डाव ४७६ वर आटोपला. न्यूझीलंडकडून नील वॅगनरने सर्वाधिक ५ तर टीम साउदीने २, मॅट हेनरी आणि मिचेल सैंटनरने प्रत्येकी १ गडी बाद केला.

इंग्लंडच्या पहिल्या डावातील १०१ धावांच्या आघाडीनंतर न्यूझीलंड संघाची दुस-या डावाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर झटपट बाद झाल्यानं त्यांची २ बाद २८ अशी अवस्था झाली होती. जीत रावल शून्यावर तर टाॅम लाथम १८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर केन विलियमसन आणि राॅस टेलरने डाव संभाळत ६८ धावांची भागीदारी केली. इंग्लंडकडून दुस-या डावात गोलंदाजीत क्रिस वोक्स आणि सॅम करनने प्रत्येकी १ गडी बाद केला. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विलियमसन ३७ आणि राॅस टेलर ३१ धावांवर खेळत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.