आधुनिक विश्लेषण पद्धतींचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन घेत राजकीय पक्षांना निवडणूक जिंकण्याचे तंत्र व मंत्र देणार्या प्रशांत किशोर यांनी अखेरीस राजकीय पक्षाची स्थापना करुन सक्रिय राजकारणात उडी घेतली आहे. बिहारच्या निवडणुकीच्या इतिहासात प्रशांत किशोर यांना आशेचा किरण दिसत आहे. पण मंडल राजकारणाची पृष्टभूमी असलेल्या बिहारमध्ये जातीचे समीकरणाशिवाय ङ्गक्त चांगली रणनिती किंवा भूमिका तसेच मोठमोठ्या घोषणा देऊन त्या बळावर सहजगत्या निवडणुका जिंकणे कठीण आहे. परंतु हे अशक्य आहे का याचे उत्तर पीकेंच्या भावी यशापयशावर अवलंबून असेल.
‘पीके’ ऊर्ङ्ग प्रशांत किशोर हे निवडणूक रणनीतीतज्ज्ञ म्हणून भारतीय राजकारणात सर्वाधिक चर्चित ठरलेले व्यक्तिमत्त्व. आजच्या स्थितीत कोणताही तरुण ज्याने प्रशांत किशोर यांच्यासमवेत काम केले असेल त्याला कोठे ना कोठे निवडणुकीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी मिळतेच. अशी खणखणीत नाण्याची प्रतिमा किंवा प्रतिष्ठा यापूर्वी एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला कधीही मिळाली नव्हती. आता प्रशांत किशोर सक्रिय राजकारणात उतरले आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पाटण्यात सभा आयोजित करून नव्या राजकीय पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे जनसुराज अभियान आता जनसुराज पक्षात परावर्तित झाले आहे.
पाटलीपुत्र अर्थात पाटणा येथील वेगवेगळे ऐतिहासिक मैदानं आणि वास्तू या स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय घडामोडींचे, उलाथालीचे साक्षीदार राहिले आहे. ङ्गार काळ नाही, पंधरा महिन्यांपूर्वी पाटण्यातील एक अणे मार्गावरील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षाच्या ‘इंडिया’ आघाडीची पायाभरणी झाली. अर्थात पायाभरणी करणारे नितीशकुमार आता वेगळे झाले, परंतु हीच आघाडी एक वर्षानंतर भारताच्या इतिहासात सर्वाधिक मजबूत विरोधी पक्षाची आघाडी म्हणून नावारुपास आली.
अर्थात आतापर्यंत प्रशांत किशोर यांना विविध राजकीय प्रयोगातून, रणनितीतून ज्याप्रमाणे यश मिळाले तसे यश नव्या भूमिकेतून मिळवता येईल का? हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर लगेच देता येणार नाही. प्रशांत किशोर ऊर्ङ्ग ‘पीके’ यांच्याप्रती सहानभुती ठेवणारे आणि त्यांच्या अजेंड्याबाबत शंभर टक्के सहमत असणारे लोक देखील साशंक आहेत. त्यांचा पहिला प्रश्न म्हणजे बिहारचे राजकारण आता ब्राह्मण करणार का? हा प्रश्न निरर्थक नाही किंवा तो पहिल्याच नजरेत चुकीचा देखील वाटणार नाही. कारण मंडल राजकारणाची पृष्टभूमी असलेल्या बिहारमध्ये जातीचे समीकरणाशिवाय ङ्गक्त चांगली रणनिती किंवा भूमिका तसेच मोठमोठ्या घोषणा देऊन त्या बळावर सहजगत्या निवडणुका जिंकणे कठीण आहे. परंतु हे अशक्य आहे का? हे देखील सांगता येणार नाही.
शेवटी बिहारने अनेकदा जातीच्या समीकरणाबाहेर आणि अन्य अडथळ्याबाहेर जात मतदान केले. लोकांनी स्वत:चा आणि कुटुंबाच्या हितासाठी जातीचे बंधने झुगारून मतदान केले आहे. काही वेळा जनता भावनात्मक मुद्दयात वाहून गेली आणि राष्ट्रीय लाटेवर आरुढ होऊनही त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मग 1977 चा मुद्दा असो,1984 किंवा 1989 किंवा 2014 ची निवडणूक असो. या निवडणुकीत बिहारच्या जनतेने उमेदवार किंवा नेत्यांची निवड करताना जात पाहिली नाही. जर प्रत्येकवेळी बिहारचे लोक जात पाहूनच मतदान करत असतील तर ते केवळ जातीकडेच पाहून मतदान करत नाहीत हे देखील समजून घेतले पाहिजे. केवळ जातीच्या आधारावर मतदान झाले असते तर अवघा तीन टक्के लोकसंख्या असलेल्या जातीचे प्रतिनिधित्व करणारे नितीशकुमार आज वीस वर्षांपासून बिहारच्या राजकारणात केंद्रीय शक्ती म्हणून नावारुपास आले नसते.
जात प्रभावी राहिली असती तर ते पहिल्यांदाही निवडून आले नसते. याउलट लोकांनी त्यांना 2005 मध्ये प्रचंड मतांनी निवडून दिले आणि केवळ लवकुश समीकरण केले म्हणून निवडून दिले नाही किंवा त्यांच्यासमवेत सवर्ण आणि वैश्य मतपेढीचे भाजप आहे म्हणूनही नाही, तर त्यांनी बिहारच्या ‘ जंगलराज’चा जो नॅरेटिव्ह तयार केला, ते पाहून लोकांना स्थितीची जाणीव झाली आणि राज्याची स्थिती बदलण्यासाठी नितीशकुमार यांना भरभरून मतदान केले. पुढच्याच निवडणुकीत म्हणजे 2010 मध्ये त्यांच्या आघाडीने बिहारमधील 85 टक्के मते मिळवली अणि तो निकाल देखील जातीच्या समीकरणावर आधारित नव्हता. उलट बिहारच्या जनतेला नितीशकुमार यांचे सुशासन आवडले आणि सकारात्मक बदलाच्या अपेक्षेने त्यांना मतदान केले. या निवडणुकीनंतर नितीशकुमार यांची रणनिती बदलली आणि त्यांनी 2015 आणि 2020 मध्ये केवळ जातीच्या समीकरणावर निवडणूक लढवली. परिणामी दोन्ही वेळेस त्यांच्या जागा कमी झाल्या. 2020 मध्ये तर केवळ 43 जागांचाच पक्ष राहिला. विचार करा, जेव्हा ते सुशासनाच्या नावावर लढले तेव्हा त्यांनी 116 जागा जिंकल्या होत्या. मात्र जातीचे समीकरण पुढे केले तेव्हा त्यांना एकदा 71 तर दुसर्यांदा 43 जागा मिळाल्या.
बिहारच्या याच निवडणुकीच्या इतिहासात प्रशांत किशोर यांना आशेचा किरण दिसत आहे. ते जातीचा मुद्दा काढत नाहीत. उलट सर्व जाती अणि धर्मांच्या लोकांना आवाहन करत म्हणतात, ‘‘तुम्ही त्यांचे बंधू होत एका किंवा दुसर्या पक्षाला मतदान केले, पण या पक्षांनी तुमच्यासाठी काहीच केले नाही.’’ प्रशांत किशोर यांनी पक्षाच्या स्थापनेची माहिती देण्यासाठी माध्यमांना आणि अन्य नागरिकांना पाठवलेली निमंत्रक पत्रिका ही पक्षाची संभाव्य भूमिका अधोरेखित करते. त्यांनी म्हटले, की व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी मी पाऊल टाकत आहे. त्यांनी खूपच विचारपूर्वक सत्ता बदल किंवा एखाद्याला पराभूत करणे किंवा जिंकण्याचा मुद्दा मांडलेला नाही. बिहारची जनता एकत्र येत असेल तर ते व्यवस्था बदलण्यासाठीच येतील, हे ‘पीके’ यांना ठाऊक आहे.
कारण गेल्या 35 वर्षांपासून बिहारमध्ये जवळपास एकसारखी किंवा अधिकाधिक दोन प्रकारच्या व्यवस्था अनुभवास आल्या. पहिली व्यवस्था लालूप्रसाद यांची तर दुसरी नितीशकुमार यांची. या दोन्ही नेत्यांनी आपापली ऐतिहासिक भूमिका बजावली आणि आता त्यांच्याकडे बिहारला देण्यासाठी काहीच राहिले नाही. त्यामुळे व्यवस्थेच्या पातळीवर जनतेचा अपेक्षाभंग तर आहेच आणि नेतृत्वाचीही कमतरताही जाणवत आहे. तेजस्वी यादव ही रिकामी जागा भरून काढू शकलेले नाहीत. कारण त्यांच्याकडे नवी भूमिका किंवा दृष्टी नाही. ते राजदच्या मुस्लिम, यादव मतपेढीच्या मोहापासून दूर जावू शकले नाहीत.
प्रशांत किशोर यांचा दुसरा मुद्दा म्हणजे त्यांनी बिहारला ज्ञानाची भूमी सांगत सुरू केलेली मोहिम. आज जगभरात ज्ञानाष्ठित अर्थव्यवस्था आहे परंतु बिहारने मात्र अनेक दशकापूर्वी किंवा शतकांपूर्वीच ज्ञानाचा मुद्दा सोडून दिला. बिहारचे नागरिक आजही अभिमानाने प्राचीन काळातील गौरवशाली शिक्षण केंद्र नालंदा, विक्रमशीला,उदयंतपूरीचा मुद्दा काढतात. वास्तविक बिहारने शिक्षणाचा मार्ग सोडला नसता तर एवढी दुरावस्था झाली नसती. कधीकाळी बिहार ज्ञानाचे आणि शिक्षणाचे सर्वोच्च स्थान राहिले आहे. नालंदा विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी जगभरातील विद्यार्थी येत असत आणि प्रवेशद्वारावरील चौकीदार हा त्यांच्या प्रतिभेची परीक्षा घेत असे. एकदा शंकराचार्य हे शास्त्रार्थ शिकण्यासाठी प्रयागराजला तत्त्ववेत्ते कुमारिल भट्ट यांच्याकडे गेले तेव्हा कुमारिल भट्ट म्हणाले, तुम्ही आमचे मेहुणे मंडन मिश्र यांच्याकडून शास्त्रार्थाचे शिक्षण घ्यावे.
मंडन मिश्र यांच्या घराचा पत्ता सांगताना कुमारिल भट्ट म्हणाले, ज्या दरवाजावर पोपट संस्कृतमध्ये शास्त्र शिकताना दिसेल, तेच मंडन मिश्र आणि उदय भारती यांचे घर. विचार करा, जेव्हा जगभरातील विद्यार्थ्यांची प्रतिभा प्रवेशद्वारावरील चौकीदार तपासत असेल आणि पोपट संस्कृतमध्ये विद्या शिकत असेल आणि अशा भूमीवरचे ज्ञान कालांतराने अस्तंगत होत असेल तर तेथील लोकांचे काय होईल? प्रशांत किशोर हे बिहारमध्ये ज्ञानाची आटलेली गंगा पुन्हा प्रवाहित करण्याचे प्रयत्न करणार आहेत.
ते बिहारच्या भूमीवर पुन्हा ज्ञानाची गंगा आणणारे भगीरथ ठरू शकतात. त्यांचे मुद्दे बिहारच्या जनतेच्या आशा पल्लवीत करणारे आहेत. त्यामुळेच त्यांच्या पक्षाच्या स्थापनेच्या सोहळ्यात देशभरातील आणि जगाच्या प्रत्येक भागातील नागरिक सामील झाले. लक्षात ठेवा, दहा वर्षापूर्वीचा दिल्लीतील अशाच प्रकारचा अरविंद केजरीवाल यांचा प्रयोग यशस्वी राहिला. परंतु असे उदाहरण सांगितले की, लोक म्हणतात बिहार हे दिल्ली नाही. अगदी बरोबर, बिहार दिल्ली नाही, परंतु दिल्ली तर मिनी बिहार आहे. बिहारच्या लोकांनी दिल्लीत चमत्कार घडविला असेल तर बिहारमध्ये का दाखवू शकत नाहीत? तेथे देखील आशा-आकांक्षांच्या वावटळीत जात आणि धर्माची भिंत पडू शकते.
– संगीता चौधरी