रूपगंध : शून्य

“”मिहिर, आजचे शाळेत झालेले नाटक एकदम भारी होते ना?”
“”हो ना! शून्याचा दरबार’. एरव्ही किती वेळा गणिते सोडवताना शून्य वापरले आहे; पण आज त्याचे महत्त्व कळले आणि मुख्य म्हणजे शून्याच्या शोधात भारताचे योगदान आणि त्याचा सगळ्या जगाला झालेला उपयोग याविषयी बघताना तर फार भारी वाटले.”
मिहिर आणि प्रणवचे “शून्याचा दरबार’ या नाटकाविषयी भरभरून बोलणे पिंट्या ऐकत होता.
“”भारताचे योगदान? कसे काय? ते मलाही सांगा की नीट समजावून.” पिंट्याने उत्सुकतेने विचारले.
“”अरे अगदी पूर्वी मोजमाप करण्यासाठी चिन्हांचा वापर करत. पण मग या चिन्हांच्या वापरावर मर्यादा येणारच ना?” मिहिरने सांगायला सुरुवात केली.
“”का बरं? मर्यादा कशा काय होत्या?”
“”समजा, तुला पन्नास वस्तू दाखवायच्या असतील तर त्यासाठी किती खुणा कराव्या लागतील?” प्रणवने विचारले अन् पिंट्याने समजलं अशी मान हलवली.त्यामुळे मिहिरने पुढे बोलणे पुढे सुरू ठेवले.
“”तर जगभरात वेगवेगळ्या प्रकारे संख्या लेखन केले जायचे रोमन पद्धतीमध्ये विविध लॅटिन अक्षरांनी संख्या दाखवली जायची. पण मग मोठ्या संख्या लिहिताना अक्षरांचा वापर करणे अडचणीचं ठरत होतं.अशीच अडचण इतरांनाही जाणवत असणार.”
“”पण मग शून्याचा आणि भारताचा काय संबंध?” पिंट्याने विचारले.
“”अरे भारतीय गणिती आर्यभट्ट यांनी इ.स. 456 च्या आसपास शून्य संकल्पनेचा स्पष्ट उल्लेख केला आहे. अर्थात, आता शून्य गोलाकारात (0) दाखवले जाते पण त्या काळात मात्र शून्यासाठी टिंबाचा (.) उपयोग केला जायचा.” प्रणवने पुढची माहिती दिली.
आज पिंट्यामध्ये प्रणवचा शंकासूर घुसला होता. “”अरे पण शून्याची जगाला ओळख कशी काय झाली? हे नाटकात सांगितले होते का?”
“”हो ना. शून्याची ओळख म्हणजेच दशमान पद्धतीनुसार संख्या कशा लिहायच्या हे आधी अरब लोकांना भारतीयांकडून समजले आणि त्यांच्याकडून शून्याचा प्रसार युरोपमध्ये झाला.” प्रणवने नाटकातून मिळालेली माहिती पिंट्याला सांगितली.
“”पण प्रणव मला सगळ्यात काय जाणवले ते सांगू?” मिहिर मध्येच बोलू लागला. “”बघ ना! एरव्ही काहीच नाही हे दाखवण्यासाठी म्हणून शून्याचा वापर करतो. अगदी “ए झिरो’ असेही चिडवतो कुणाला.”
“”हो… पण तुला काय विशेष जाणवले नाटकातून?”
“”अरे काहीच नाही म्हणून शून्य. पण हाच शून्य मात्र इतर कोणत्याही अंकासमोर आला की मात्र त्या अंकाची किंमत एकदम दहा पटीत वाढते.”
“”शून्याच्या शोधामुळे द्विमान, त्रिमान, पंचमान अशा कोणत्याही पद्धतीमध्ये संख्या दर्शवणे शक्य झाले आहे आणि मिहिर तुला तो श्लोक सगळ्यात शेवटी सांगितला होता तो आठवतो का? शून्याचे गुणधर्म सांगणारा श्लोक होता तो असेच वाटले मला.”
“”इसवी सन पूर्व 1000-600 काळातील हा श्लोक आहे, असं मला नंतर बाबांनी सांगितले. लक्षात ठेवायला अवघड जाणार हे जाणवल्याने मी तो त्यांना विचारून लिहूनच ठेवला.
शून्यमदः शून्यमिदं, शून्यात शून्यमुदच्यते
शून्यस्य शून्यमादाय, शून्यमेवावशिष्यते
आणि श्लोकाचा अर्थ आहे, शून्यातून शून्य वजा केले तरी शून्य उरते, शून्यात शून्य मिळवले तरी उत्तर शून्य येते. आणखीही काहीतरी गंभीर अर्थ सांगितला बाबांनी, पण तो मात्र डोक्यावरून गेला हे मात्र खरं.” बालमित्रांनो, तुम्हालाही हे नाटक बघायला मजा आली असती ना? असं करा तुम्हीही प्रयत्न करा की असे नाटक करायचा.
– विशाखा गंधे





