रूपगंध : परीक्षा आयुष्याची…

आम्ही लहान असताना शाळांना नव वर्ष सुरू झाले की फारशा सुट्या नसत. सारे सणवार, संमेलन, सहल डिसेंबरपर्यंत संपत आणि फेब्रुवारी पासूनच वार्षिक परीक्षेचे वेध लागत. हवेत आणि वातावरणातही थोडी गरमी सुरू होई. खास परीक्षेचे असे थोडे गंभीर पण उत्साही वातावरण असे. 10वी, 12वी पेपरच्या तारखा आल्या की घरातील नियम बदलत.

वर्षभरात केलेल्या अभ्यासाच्या उजळणीचा तो काळ. वेळेत पेपर सोडवण्यासाठी सराव सुरू होई. आई, वडील, शाळेतील शिक्षक, दादा, ताई सर्वांना तो परीक्षार्थी दिसत असे. मग त्याच्या अभ्यासाबरोबर खाणे पिणे, खेळणे या सगळ्यांवर लक्ष ठेवले जाई. खेळण्यावर नक्‍की बंधने येत. घरात मंगलकार्य ठरत असेल तर आवर्जून परीक्षेच्या तारखा बघून मुहूर्त काढले जात.
एकदा शालेय जीवनात प्रवेश केला की प्रत्येकाला बरीच वर्षे या परीक्षांना तोंड द्यावे लागते.

परीक्षेची तुम्ही किती उत्तम तयारी करता आणि त्यात कसे यश मिळवता यावर बऱ्याच प्रमाणात तुमचे पुढील आयुष्य, भावी जीवनाचा पाया ठरतो. परीक्षा हा आयुष्यातील मोठा टप्पा असतो. उत्तम तयारी असेल तर परीक्षा सोपी जाऊ शकते, पण आयुष्यात काही परीक्षेचे क्षण असे असतात की त्यात उत्तीर्ण होणे अवघड होऊन जाते. अशा अनेक परीक्षा आपण नेहमीच देत असतो.

नोकरी मिळवण्यासाठी दिलेला इंटरव्ह्यूहीसुद्धा मोठी परीक्षाच असते. लग्नाच्या वेळी दाखविण्याच्या कार्यक्रमालादेखील वधूपरीक्षा असंच म्हटले जाते. अशी वराची मात्र परीक्षा होत नसते. काही कठीण प्रसंगाचे वर्णन करतानासुद्धा परमेश्‍वर अगदी परीक्षा बघत होता… असं आपण सहज बोलून जातो.

नुकतेच आपण सारेच मोठ्या परीक्षेच्या काळातून जाऊन थोडे डोके वर काढत आहोत. करोनाची ही परीक्षा जवळपास दोन वर्षे चालू आहे आणि ती अनपेक्षित आणि खरोखरच आपल्या संयमाची, चिकाटीची, आरोग्याची, प्रतिकारशक्‍तीची आणि मानसिक संतुलनाची मोठी कठीण परीक्षा होती.

परीक्षा कोणतीही असो, त्यासाठी उत्तम तयारी करूनच बसावं. आई वडील, कमी मार्क पडले तर लहानपणी रागवायचे, अभ्यास करायला बसवायचे तेव्हा कदाचित आपल्याला त्यावेळी राग येत असतो. पण म्हणूनच आपण तयार होतो पुढच्या कठीण परीक्षा देण्यासाठी. आपली जडणघडण त्याच काळात होत असते.

मग परीक्षा कुठलीही असो, अगदी सासरी गेल्यावर पहिल्यांदा स्वयंपाक करायची जरी असली तरी विद्यार्थी बनून आपण पूर्ण तयारीनिशी आणि मनापासून तयारी करतो. कुठलीही परीक्षा नुसते उत्तीर्ण होण्याची नसते. त्यातून काही शिकण्याची आणि उत्तम यश मिळवण्यासाठी जिद्दीने कार्यरत राहण्यासाठी असते.

आरती मोने

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.