रूपगंध: छत्रपतींचे पुण्यात आगमन

पुण्यात बाजीराव मार्गावर शिवाजीनगरला जाताना शिवाजी प्रीपेरेटरी स्कूलच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा आहे. 13.5 फूट उंच, 13 फूट लांब आणि 3.5 फूट रुंद असा हा ब्रॉन्झचा भव्य एकसंध पुतळा विख्यात शिल्पकार व्ही. पी. करमरकर यांनी तयार केलेला आहे. 16 जून 1928 रोजी ह्या पुतळ्याचे अनावरण केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणून शिवाजी मिलिटरी स्कूल आणि महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा तयार करण्याचे काम ग्वाल्हेरचे माधव महाराज शिंदे यांच्या पुढाकाराने होत होते. त्यासाठी 16 लाख रुपये जमवण्यात आले होते. ही गोष्ट 1921 साली सुरू झाली. दरम्यान माधवराव शिंदे यांचा मृत्यू झाला आणि कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी या कार्यात पुढाकार घेतला.

शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांकडे ती जबाबदारी आली. राजाराम महाराजांनी छत्रपतींच्या अश्‍वारूढ पुतळ्याची जबाबदारी स्वत:कडे घेऊन बाकी भाग स्मारक कमिटीकडे सोपवला. पुतळ्याच्या कामासाठी दोन लाख रुपये मी स्वत: देऊन ते पूर्ण करून घेईन, असे आश्‍वासन त्यांनी कमिटीला दिले.

1928 सालीच पुतळा पूर्ण व्हावा अशी राजाराम महाराजांची इच्छा होती. स्मारक कमिटीने लंडन, फ्रान्स, इटलीमधील शिल्पकारांकडून पुतळ्याच्या किमतीचे आकडे मागवले होते. ते 3 ते 4 लाख रुपयांपर्यंत होते. मात्र राजाराम महाराजांनी भारतीय शिल्पकाराकडूनच हा पुतळा तयार करून घ्यायचे ठरवले. त्यासाठी प्रथम म्हात्रे व अखेरीस करमरकरांची निवड होऊन करमरकरांनी पुतळ्याचे काम पूर्ण केले. राजाराम महाराजांची आणि करमरकरांची पहिली भेट 1924 साली कलकत्त्यात करमरकरांच्या स्टुडिओत झाली.

छत्रपतीं शिवाजी महाराजांचा हा अश्‍वारूढ पुतळा मुंबईत तयार होऊन पुण्यात येईपर्यंतचा सगळाच इतिहास अतिशय लक्षवेधक आणि उत्कंठावर्धक आहे. पुतळा तयार होण्यापूर्वी, तो होत असताना आणि तयार झाल्यावरही त्यात मोठे राजकारण-हेवेदावे होतच होते. पण सर्वांवर मात करत छत्रपतींचा पुतळा वेळेत तयार झाला आणि त्याची स्थापनाही करण्यात आली.

पुतळा तयार होताना आणि विशेषत: 1 जून 1928 रोजी तो तयार झाल्यानंतर मुंबईतील स्टुडियोतून 16 जून 1928 रोजी पुण्यात शिवाजी प्रीपेरेटरी स्कूलच्या आवारात येईपर्यंतचा प्रवास हा महाराजांच्या आग्य्राहून सुटकेसारखाच श्‍वास रोखायला लावणारा होता. 16 जून महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण दिवस. त्या प्रसंगाला 93 वर्षे पूर्ण झाली.महाराजांचा पुतळा 1 जूनलाच तयार झाला. आता तो पुण्याला कसा न्यायचा असा प्रश्‍न उभा राहिला.

पुतळा पुण्याला नेण्याची जबाबदारी स्वत: शिल्पकार करमरकर यांच्यावर सोपवण्यात आली. 13.5 फूट उंचीचा पुतळा पॅकिंग केल्यानंतर 15 फूट उंच झाला असता. तो न्यायचा कसा यावर माझगाव डॉकचे मॅनेजर रॉसमिसन, पी. अँड ओ कंपनीचे सर्व आर्किटेक्‍ट्‌स, इंजिनियर्स जमले. बोगद्यातून पुतळा कसा न्यायचा याचा खल सुरू झाला.

पुतळा बोटीने रत्नागिरीला न्यावा व तेथून कोल्हापूर मार्गे ट्रक वा रेल्वेने पुण्याला न्यावा असा एक विचार पुढे आला. पण वेळ कमी असल्याने (15 दिवस) असल्याने तो मागे पडला. शिवाय पावसाळ्यामुळे तो बोटीवर जाणे अशक्‍य, लॉरीवर जाणे अवघड अशा अडचणी पुढे आल्या. नंतर बोगद्यांची उंची किती, त्यांची नक्‍की मापे आणण्याचे ठरवले. त्यावेळच्या जीआयपी रेल्वे इंजिनियर्सना भेटून चौकशी झाली.

बोगद्यांची मापे आली. सर्वात लहान बोगद्याची उंची कमानीच्या मधोमध साडेनऊ फूट होती. त्यातून पुतळा जाणार नाही असे ठरले. अखेर जीआयपीच्या इंजिनियर्सना बोलावून चर्चा केली व पुतळा पॅक न करता नेण्याचे ठरले.रेल्वे वॅगनची उंची रुळांपासून तीन साडेतीन फूट असते. पुतळा नेण्यासाठी रुळापासून एक फूट उंचीचा खास ट्रक बनवायचे ठरवले. पुतळा पॅक न करता बोगद्याच्या कमानीतून जाईल इतका तिरका करून नेण्याचे ठरवले.

तसे केल्यास उंची किती कमी होते याचा अंदाज काडेपेटी तिरकी करून घेतला. नंतर माझगाव डॉकमध्ये जाऊन त्यांचे इंजिनियर्स व मॅनेजर रोसमिसन यांच्याशी विचारविनिमय केला. सर्वांच्या कागद पेन्सिली चालू होत्या. अखेर हे शक्‍य आहे असे दिसून आले. जीआयपी इंजिनियर्स व ट्रॅफिक मॅनेजर्सना भेटून निश्‍चित काय ते ठरवण्यासाठी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्लॅन केला.

पुतळा जाऊ शकेल पण तो पोहचेपर्यंत जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्या बंद ठेवाव्या लागणार होत्या. ते तर शक्‍य नव्हते. मग त्यावर उपाय म्हणून ट्रक रिव्हॉल्विंग करण्याचे ठरवले. म्हणजे बोगद्याजवळ आला की पुतळा फिरवून उंच भाग बोगद्याच्या मधोमध घ्यायचा आणि बाहेर आला की फिरवून उंच भाग बोगद्याच्या बाजूने घ्यायचा म्हणजे फक्‍त बोगदा ओलांडताना बाजूच्या गाड्या बंद ठेवाव्या लागतील. मात्र या योजनेसाठी रेल्वे चीफ कमिशनर व इतर अधिकाऱ्यांची संमती पाहिजे होती.

हा एकूणच प्रकार रेल्वेच्या इतिहासात नोंद घेण्यासारखा असल्याने सर्वांचा उत्साह वाढला व प्रयत्न सुरू झाले. खर्चाचा काही प्रश्‍न नव्हता. पुतळा वेळेवर पोहचणे महत्त्वाचे होते.
माझगाव डॉकमध्ये 10 जूनला सकाळी 10 वाजता पुतळा पॅकिंगशिवाय ट्रकवर चढवण्यात आला. युरोपिय, मुस्लीम, पारशी, ख्रिश्‍चन वगैरे सर्वच जमातीचे लोक पुतळा ट्रकवर चढवताना शिवाजी महाराजांचा जयजयकार करत होते.

नारळ फोडत होते. तो देखावा अविस्मरणीय होता. इंजीन आले. त्याला सेकंड क्‍लासचे दोन व थर्ड क्‍लासचा एक डबा जोडलेला होता. तीन डबे व पुतळ्याचा ट्रक घेऊन इंजीन वडाळा स्टेशनला आले. करमरकर, रॉसमिसन, फाउंड्रीतली माणसे वगैरे मिळून सुमारे 50 माणसे महाराजांच्या पुतळ्याबरोबर जयजयकार करीत, गुलाल उधळीत वडाळ्याहून पुण्याला निघाली. ही बातमी पसरताच रेल्वे लाइनवर लोकांचा प्रचंड जमाव जमला.

वाटेतल्या प्रत्येक स्टेशनवर गर्दी जमत होती, महाराजांचा जयजयकार करत होती. मुंबईतील श्री कल्याणजी धरमजी यांना ही वार्ता कळताच ते ताबडतोब मोटारीबरोबर कॅमेरा घेऊन निघाले. ते फिल्म घेत होते. घाटावरची आणि बोगद्याजवळची अनेक दृश्‍ये त्यांनी टिपली. बोगद्यातून पुतळा जात असताना कमानीच्या खाली फक्‍त दोन तीन इंच पुतळ्याचे डोके होते.

तेव्हा सर्वांचा जीव वरखाली होत होता. अखेर 10 जूनला संध्याकाळी 7 वाजता रेल्वे भांबुर्ड्याला (आजचे शिवाजी नगर) आली. शिवाजी महाराज सर्वांना घेऊन सुखरूप पुण्यास पोहचले आणि तिथून मिरवणुकीने रात्री दहा वाजता पुतळा उभारण्याच्या जागी आला. सर्व तयारी होऊन 16 जूनला गव्हर्नर लेल्सी विल्यम्स यांनी महाराजांच्या पुतळ्याचे उद्‌घाटन केले. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.

नरेन्द्र आढाव

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.