बुलढाणा – देशात पुढील सहा ते सात महिन्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेमध्ये लहान मुले प्रादुर्भावग्रस्त होणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने लाटेपासून लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी आतापासून तयारीला लागावे. त्यासाठी जिल्ह्यातील रूग्णालयांमध्ये विशेष बाल रोग तपासणी कक्ष तयार करण्यात यावे. तसेच बेडची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या.
स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कोविडबाबत आढावा बैठकीचे आयोजन केले. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते.
डॉ. शिंगणे म्हणाले, म्युकर मायकोसिस आजाराबाबत सध्या बाधित रूग्णांवर प्रभावी उपचार करावे. या आजारावरील इंजेक्शन व औषधांचा मागणीनुसार पुरवठा सनियंत्रीत करावा. कुठेही औषधाविना रूग्णांचे हाल होवू नये. म्युकर मायकोसिस आजाराबाबत रूग्णालयांना स्वच्छतेबाबत सूचीत करावे. सर्व शासकीय व खाजगी रूग्णालयांमध्ये स्वच्छतेला प्राधान्य द्यावे.
म्युकर मायकोसिस उपचाराकरीता जिल्हा सामान्य रूग्णालयात शस्त्रक्रीया कक्षाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. तिसऱ्या लाटेत लहान मुलांवरील उपचारांसाठी बाल रोग तज्ज्ञांची समिती तयार करावी. त्यांचे मार्गदर्शन घेण्यात यावे.
जिल्ह्यात बऱ्याच गावांनी लोकांच्या पुढाकारातून विलगीकरण कक्ष स्थापन केलेले आहे. या कक्षात गावातील संशयीत रूग्णांना आणून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे गावातील संसर्गाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, असे कक्ष जिल्हा परिषदेने गावागावात सुरू करण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.