रोनाल्डोच्या सरावाने युरोपला दिलासा…

रोम – युव्हेंट्‌सचा स्ट्रायकर व पोर्तुगालचा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने प्रत्यक्ष मैदानात उतरत सरावाला प्रारंभ केला असून त्यामुळे युरोपातील अनेक देशांना दिलासा मिळाला आहे.
करोनामुळे इटली, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड आदी देशांत प्रचंड हानी झाली आहे. हजारो व्यक्‍तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या पाच देशांत मिळून जवळपास 1 लाखांपेक्षाही जास्त लोकांचे करोनामुळे मृत्यू झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर येथील क्रीडा क्षेत्र ठप्प झाले होते. मात्र, हा धोका संपुष्टात येत असल्याचे दिसत असताना तेथील सरकारने देखील सराव व स्पर्धांच्या आयोजनावरील निर्बंध उठवल्याने इटलीसह सर्व युरोपीय देशांना दिलासा मिळाला आहे.

रोनाल्डोला देखील करोनाच्या धोक्‍यामुळे घरातच थांबावे लागले होते. मात्र, सरकारच्या परवानगीनुसार युव्हेंट्‌स या अव्वल क्‍लबने सराव सत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला व त्यात पहिल्याच दिवशी रोनाल्डो सहभागी झाला. या सरावादरम्यान स्थानिक रेफ्रीच्या उपस्थितीत त्याने कृत्रिम अडथळे उभारून सराव केला व अनेक गोलदेखील नोंदवले. सरावात सहभाग घेण्यापूर्वी रोनाल्डोची वैद्यकीय चाचणीही घेण्यात आली व त्यात निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच त्याला सरावाला परवानगी देण्यात आली.

रोनाल्डो पोर्तुगालमधून या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येथे दाखल झाला व त्याला त्याच्या येथील घरातच विलगीकरणात राहावे लागले होते. त्यानंतर ही चाचणी घेण्यात आली व त्यातील अहवालात तो निगेटिव्ह असल्याचे सिद्ध झाल्यावर त्याला मैदानात उतरण्याची परवानगी देण्यात आली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×