चुलबुल पांडे अर्थात सलमान खानच्या “दबंग-3’मध्ये साउथमधील प्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीपने खलनायकाची भूमिका साकारली आहे. आता सलमान खानच्या आगामी “राधे ः यॉर मोस्ट वॉन्टेड भाई’ चित्रपटातही आणखी एक साउथमधील सुपरस्टार व्हिलनच्या भूमिकेत झळकणार आहे.
भरत असे त्या अभिनेत्याचे नाव आहे. त्याने सनी लियोनी आणि सचिन जोशी यांच्या “जॅकपॉट’ चित्रपटातून बॉलिवुडमध्ये डेब्यू केले होते. साउथमधील चित्रपटात भरतने अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. तो आता “राधे’ चित्रपटात आपला जलवा दाखविणार आहे. भरतने आपल्या इंस्टाग्रामवर सलमानसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले आहे की, अखेर माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यासाठी मी प्रभुदेवाचे आभार मानतो. कारण त्यांनी माझयावर विश्वास दाखविला. पुढील अपडेट्स लवकरच…!
दरम्यान, “राधे’ चित्रपट 2009मध्ये प्रभुदेवाने दिग्दर्शित केलेल्या “वॉन्टेड’चा सिक्वल आहे. काही दिवसांपूर्वी सलमानने या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित केले होते. ज्याला चाहत्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता. हा चित्रपट 2020मध्ये ईदवेळी प्रदर्शित करण्यात येणार आहे. सध्या सलमान खान हा “दबंग-3’च्या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे.