सध्या जगभरासह भारतामध्ये देखील वेब सिनेमाने प्रेक्षकांना चांगलेच वेड लावले आहे. वेब सिनेमाचं हे विश्व दिवसेंदिवस वाढत असून, यामध्ये बडे कलाकारसुद्धा भूमिका साकारण्यामध्ये रुची दाखवत आहेत. आता वेब सिनेमांमध्ये काम करणाऱ्यांच्या यादीमध्ये आणखीन एका मोठ्या नावाची भर पडली असून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिझ नेटाफिक्सच्या ओरिजनल सिनेमामध्ये काम करणार आहे.
‘मिसेस सीरियल किलर’ असे या वेब सिनेमाचे नाव असून जॅकलीनने आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे याबाबत माहिती देखील दिली आहे. ‘माझा नेटाफिक्स ओरिजनलवर मिसेस सीरियल किलर हा वेब सिनेमा येत असुन, या सिनेमाबद्दल मी फार उत्सुक आहे.’ असं तिने ट्विटमध्ये म्हंटल आहे.
मात्र, जॅकलीन ‘मिसेस सीरियल किलर’ या वेब सिनेमात कोणत्या भूमिकेत दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी ती या सिनेमाच्या टायटल प्रमाणेच एखादा गंभीर रोल साकारणार असल्याचे स्पष्ट आहे. ‘मिसेस सीरियल किलर’ हा एक मर्डर मिस्ट्री वेब सिनेमा असल्याची चर्चा आहे. या वेब सिनेमाची निर्मिती फराह खान करणार असून, दिग्दर्शन फराहचे पती शिरीष कुंदर करणार आहेत.