रोखठोक : उद्योगधंद्यातील “भांडा सौख्यभरे!’ 

हेमंत देसाई 

आपापसातील मतभेद दूर करून राजकीय स्थैर्य दिले, तरच देशाची प्रगती होईल, असा ऊठसूठ सरकारला सल्ला देणारे उद्योगक्षेत्र हे स्वतःदेखील अंतर्गत संघर्षापासून मुक्त नाही. मध्यंतरी सिंघानिया घराण्यातील मतभेदांनी विखारी स्वरूप धारण केले होते. येस बॅंकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांची टर्म वाढवण्यास रिझर्व्ह बॅंकेने नकार दिला आहे. बॅंकेचे सहसंस्थापक आणि माजी अध्यक्ष दिवंगत अशोक कपूर यांची पत्नी मधू कपूर व इतर कुटुंबीयांना बॅंकेपासून दूर ठेवण्यात आले होते. पाचेक वर्षे दोन्ही कुटुंबीयांतील बोलणेही बंद झाले होते. त्यानंतर तडजोडीच्या दिशेने प्रगती करण्यात आली. मात्र या निमित्ताने बॅंकिंग असो वा खासगी उद्योग, तेथील मालकांमधील दुहीची चर्चा सुरू झाली आहे. 

बजाज समूहातील समझोत्याची बातमी तर ताजीच आहे. कुटुंबातील वेगवेगळ्या घटकांनी समूहातील कंपन्यांमधील मालकीत संयुक्तपणे सहभागी कसे व्हायचे, वारसदार कोण, ही प्रक्रिया कशी हाताळायची, मतभेद कसे मिटवायचे, याबद्दलच बजाज समूहातील हा समझोता झाला आहे. अनेकदा घराण्यांमार्फत चालवले जाणारे उद्योग बघता बघता विस्कटतात, त्याचे तुकडे पडतात आणि त्या उद्योगधंद्याचे तेजच हरपते. उद्योगाला कॉर्पोरेट स्वरूप आले, तरी या गोष्टी व्हायच्या राहत नाहीत. “राजकारण्यांमधील घराणेशाहीवर टीका केली जाते. वारसदार कोण, यावरून एकमेकांकडे पाहून डोळे वटारले जातात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आमच्यात मात्र तसे होत नाही’, असा दावा करण्याची सोय उद्योगक्षेत्रात राहिलेली नाही. एका औद्योगिक घाराण्यातील दोन भावांमध्ये सर्वांसमक्ष अगदी हाणामारी होते, हेही उदाहरण ताजेच आहे. ज्यांनी उद्योगधंद्याचा पाया रचला असतो, ते संस्थापक आपल्या प्रेमाखातर मुलाबाळांच्या नावे उद्योग करून टाकतात. परंतु हा उद्योग टिकवण्याची जबाबदारी कुलदीपक पार पाडतातच, असे नाही. रॅनबॅक्‍सीमधील शिविंदर आणि मालविंदर सिंग या वारसदारांचीच गोष्ट घ्या. त्यांना पित्याचा वा आजोबांचा समृद्ध वारसा मिळाला. त्यांनी परस्परांना ठोसे लावले आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकला. त्यात, शिविंदरने मला छातीवर व हातावर मारून जखमा केल्या, असा आरोप मनविंदरने केला आणि त्या जखमाही दाखवल्या. गेले वर्षभर दोघे भाऊ एकमेकांवर चिखलफेक करण्यात मग्न होते. कंपनीतला निधी हडप केला, अफरातफर केली, छोट्यामोठ्या चोऱ्या केल्या, असेही आरोप करण्यात आले. एकेकाळी जगभर गौरवली गेलेली ही कंपनी त्यामुळे आत्मनाशाकडे वळाली. 2008 साली सिंग बंधूंनी रॅनबॅक्‍सीमधले आपले 34 टक्के भागभांडवल जपानच्या दैचि सॅन्क्‍यो या कंपनीस पाच हजार कोटी रुपयांना विकले. फोर्ब्स या नियतकालिकाच्या अंदाजानुसार, 2012 मध्ये या बंधूंची मालमत्ता साडेतीन अब्ज डॉलर्स एवढी होती. हळूहळू ती घसरणीला लागली. दोन वर्षांपूर्वी ही सपत्ती 1.40 अब्ज डॉलर्सवर आली. दैचि सॅन्क्‍योनेसुद्धा त्यांच्यावर खटला गुदरला आहे.

अर्थात या घराण्यात पूर्वीही हे घडले आहे. या दोन बंधूंचे वडील स्वर्गीय परविंदरसिंग यांचे स्वतःचे पिताजी भाई मोहनसिंग यांच्याशी बिनसले होते. त्यानंतर परविंदर यांचे आपल्या सख्ख्या भावांशीही भांडण झाले. त्यामुळे त्यांच्या उद्योगाची अधूनमधून वाताहतच होत गेली. औषधे निर्माण करणाऱ्या या समूहाला कोणते औषध लागू पडेल बरे, असा प्रश्न भागधारकांना पडला…

टाटा समूहाचे नेतृत्व रतन टाटांकडे आले, ते 1991 साली. परंतु या नेतृत्वाच्या शर्यतीत इतर अनेकजण होते. उदाहरणार्थ, टिस्कोचे अध्यक्ष रूसी मोदी, टेल्कोचे अध्यक्ष सुमंत मुळगावकर, एसीसचे अध्यक्ष नानी पालखीवाला तसेच फ्रेडी मेहता, दरबारी सेठ प्रभृती या स्पर्धेत होते. परंतु अखेर जेआरडी टाटा यांनी रतन यांचीच निवड केली. त्यानंतर हळूहळू या दिग्गजांना वानप्रस्थाश्रमाचा मार्ग मोकळा करून देण्यात आला…

भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 79 टक्के उत्पन्न हे कुटुंबाची मालकी असलेल्या उद्योगांमधून येते. याबाबतीत अमेरिका व जर्मनीनंतर भारताचा क्रमांक लागतो. सिंघानिया समूहाला 90 वर्षांचा इतिहास आहे. मात्र धंदा कसा चालवायचा, यावरून विजयपत सिंघानिया व त्यांचे पुत्र गौतम यांच्यात झगडा झाला. कुटुंबप्रधान उद्योगधंद्यांमुळे फायदे होतात, तसेच तोटेही. कुटुंबप्रधान पद्धतीमुळे बऱ्याचदा काळानुसार व्यवसायात बदल करण्यामध्ये बाधा येते. कोटा-परमिटराज होते, तेव्हा राजकारण्यांशी उत्तम संबंध प्रस्थापित केला की, यशस्वी होता येत असे. उदारीकरणोत्तर काळात औद्योगिक कौशल्यांना अधिक महत्त्व आले. बाजारपेठ, व्यवस्थापन, मनुष्यबळाची हाताळणी हे विषय गुंतागुंतीचे बनत गेले. अगदी इन्फोसिसचे उदाहरण घेतले, तरी त्यांना सुरुवातीला जे यश मिळाले, ते टिकवताना नंतर अडचणी आल्या. कंपनीतून संस्थापकांनी निवृत्ती जाहीर केली आणि नंतर पुन्हा संन्यासाची वस्त्रे फेकून दऊन, नारायणमूर्तींनी अध्यक्षपद हाती घेतले. ते जाऊन, अध्यक्षपदी दुसरे संस्थापक नंदन नीलकेणी आले.

नारायणमूर्तींचे कंपनीच्या संचालकांशी मतभेद झाले. या सगळ्याचा इन्फोसिसच्या धंद्यावर काही काळ विपरीत परिणाम झाला, म्हणजे, पारंपरिक उद्योगातच नव्हे, तर आयटी टेक्‍नॉलॉजीसारख्या नवोद्योगातही खणाखणी होतच असते. काहीवेळा कंपनीत दोन सत्ताकेंद्रे तयार होतात. एकमेकावर शिरजोरी करण्याचा प्रयत्न होतो. अंबानी बंधूंनी एकमेकांची धुणी जाहीरपणे धुतली आणि आई कोकिळाबेन यांनी हस्तक्षेप केल्यानंतरच त्यांच्यात विभागणी झाली. त्यानंतरच्या काळात मुकेश अंबानी प्रगती करत गेले, तर धाकटे बंधू अनिल यांची मात्र घसरगुंडी होत राहिली.

उद्योगधंद्याची भविष्यकालीन योजना, गुंतवणूक, संपत्तीचे वाटप, वारसा हक्क यावरून औद्योगिक घराण्यात वादांना सुरुवात होत असते. हे प्रश्न नीट न हाताळल्यास, बापजाद्यांनी मोठ्या कष्टाने उभारलेला उद्योग रसातळाला जातो. कित्येकदा तिसऱ्या पिढीत हा संघर्ष अधिक पृष्ठपातळीवर येत असतो. रिलायन्सचे धिरूभाई अंबानी आणि विप्रोचे प्रेमजी हे संस्थापक. आता या दोन्ही समूहांमधील वारसदारांमधला व मालमत्तेचा प्रश्न सोडवण्याची वेळ आली आहे. जो ते कसे सोडवतात, हा खरा प्रश्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)