‘रोहित-विराट’ वाद संघासाठी घातक

-वाद नाही मात्र खद खद जाणवतेच

-ट्‌विटरवर रोहितने का केले अनफॉलो

पुणे – विश्‍वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर संघात दुफळी माजली असल्याचे वृत्त अनेकांनी दिले होते. ही दुफळी कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्या दरम्यान झालेल्या वादांमधून झाली असल्याचेही अनेकांनी सांगितले. मात्र, हे वृत्त बीसीसीआयसह अनेक क्रिकेटपटूंनी नाकारले आहे. असले तरी गेल्या काही काळात झालेल्या घडामोडींनी हे वृत्त खरे असल्याची शंका देखील सर्वांना येते आहे.

भारताच्या पराभवानंतर रोहित शर्मा संघापुर्वीच भारतात परतल्याने या दोघांमध्ये वाद सुरू असल्याचे वृत्त सगळीकडे पसरले. त्यातच रोहितने इन्स्टाग्रामवर विराटला अनफॉलो करत या वृत्ताला एकप्रकारे दुजोराच दिल्याचे बोलले जात होते. त्याचवेळी रोहितने केवळ विराटलाच अनफॉलो केले असे नाही. तर, त्याने विराटची पत्नी आणि बॉलीवूड ऍक्‍ट्रेस अनुष्का शर्मालाही अनफॉलो करत वादाला आणखीनच फोडणी दिली. मात्र, जरी रोहितने विराट आणि अनुष्काला अनफॉलो केले असले तरी विराट कोहली आजही रोहित आणि त्याची पत्नी रितिका यांना फॉलो करतो आहे. त्यामुळे नेमके प्रकरण कोणाच्या लक्षात येत नाही.

मात्र, पराभवानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना विराटने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. या वृत्तवाहिनीशी बोलताना विराट म्हणाला होता की, माझ्या आयुष्यात मी अनेकदा अपयशाचा सामना केला आहे, आणि वेळोवेळी त्यामधून शिकलोय. एखाद्या महत्वाच्या स्पर्धेत जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने पराभवाचा सामना करावा लागतो, त्यावेळी आपल्यात काय सुधारणा करायला हवी याची कल्पना येते. याचसोबत कठीण काळात कोण तुमच्यासोबत आहे आणि कोण तुमची साथ सोडून जातेय याचीही तुम्हाला कल्पना येते. त्यामुळे रोहित-विराटमध्ये वाद असल्याचे बोलले जाऊ लागले. त्यातच रोहित सोबतच्या वादावर प्रतिक्रिया देताना विराटने या वादाला केवळ प्रसिद्धी माध्यमांच्या रोचक बातम्या असे संबोधले होते.

बीसीसीआय मिटवणार वाद?

रोहित आणि विराटमध्ये वाद असल्याचे वृत्त सातत्याने प्रसारीत होत असताना बीसीसीआय सह विराट आणि रोहितनेही हे अनेकदा फेटाळले आहे. मात्र, जर त्यांच्यात वाद असेल तर बीसीसीआय हा वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे वृत्तही समोर आले आहे. कारण बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, जार या दोघांमध्ये वाद असेल तर तो वाद भारतीय संघाच्या कामगिरीवर परिणाम करणारा ठरु शकतो. त्यामुळे तो वाद मिटवण्यासाठी बीसीसीआय नक्‍कीच पुढाकार घेइल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी भारतीय संघासोबत अमेरिकेला जाणार आहेत. भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये, अमेरिकेच्या शिकागो येथे दोन टी-20 सामने खेळेल. राहुल जोहरी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशी चर्चा करुन दोघांचे मनोमीलन करण्याचा प्रयत्न करणार आहेत. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रीही या बैठकीला हजर राहणार असल्याचे समजते.

त्यातच या वादाच्या पार्श्‍वभुमीवर बीसीसीआयने भारताच्या पराभवाची गंभीर दखल घेत चौकशी करणार असल्याचेही जाहीर केले होते. मध्यंतरीत्या काळात बीसीसीआय मर्यादीत षटकांच्या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवून, विराटला कसोटी संघाची जबाबदारी देणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र या केवळ अफवा असल्याचे वेस्ट इंडिजसाठीच्या दौऱ्यातील संघ निवडीवरुन स्पष्ट झाले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)