pune politics : पुण्यात मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते आणि टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यासाठी ते काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माध्यमांशी बोलताना रोहित टिळक यांनी सांगितले की, सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांच्या संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानाचामानाचा टिळक पुरस्कार देण्यात आला होता. या घटनेनंतर काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्याशी काहीसे अंतर ठेवण्यास सुरुवात केली. या संदर्भात त्यांनी अनेकदा पक्षाच्या हायकमांडपर्यंत आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातून कोणताही ठोस निर्णय झाला नाही. दरम्यान, याच काळात त्यांची आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली. शिंदे यांच्यात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता आणि कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता दिसल्यामुळे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे रोहित टिळक यांनी सांगितले. रोहित टिळक यांनी पुढे सांगितले की, त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत शिंदे यांनी त्यांना राज्य सभा उमेदवारी देण्याची ऑफर दिली होती. मात्र महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याने त्यांनी माघार घेतली. शरद पवार यांच्या दीर्घ राजकीय अनुभवाचा आणि टिळक कुटुंबाशी असलेल्या स्नेहाचा विचार करून आपण राज्यसभेच्या निवडणुकीतून अर्ज न भरण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आता राज्यसभा निवडणूक हुकल्यानंतर एप्रिल महिन्यात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत रोहित टिळक यांना संधी मिळते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.