नवी दिल्ली – दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त झालेल्या रोहित शर्मा याचा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात नव्याने समावेश होण्याचे संकेत बीसीसीआयनेच दिले आहेत.
त्याला संघ निवडीच्या वेळी दुखापतीमुळे वगळण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, आता या चर्चेला पूर्णविराम बसणार असून बीसीसीआयचे फिजिओ रोहितच्या तंदुरुस्तीची चाचणी घेतील व त्यात तो फिट ठरला तर त्याचा संघात समावेश केला जाणार असल्याचे मत खुद्द बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीच व्यक्त केले आहे.
सध्या अमिरातीत आयपीएल स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना मंगळवारी झाल्यानंतर लगेचच भारतीय संघात निवड झालेले खेळाडू बुधवारी ऑस्ट्रेलियाला प्रयाण करणार आहेत. त्यांच्यासह रोहित जाणार नसला तरीही एकटा विशेष विमानाने तो रवाना होणार आहे.
भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल सोमवारी आपला रोहितबाबतचा अहवाल सादर करणार आहेत. तसेच रोहितला सध्यातरी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात येणार असून टी-20 व कसोटी मालिकेसाठी त्याला संघात स्थान दिले जाणार असल्याचेही बोलले जात आहे.