मुंबई – इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) सर्वाधिक पगारदार खेळाडू बनण्याचा मान मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने मिळविला आहे. स्पर्धेतील विविध संघांनी अनेक खेळाडूंशी कोट्यवधींचे करार केले असले तरीही सर्व निकष पार केल्यावर खेळाडूंना ही पूर्ण रक्कम मिळतेच असे नाही त्यामुळे प्रत्येक सामन्यासाठी जी रक्कम प्रत्यक्ष दिली जाते व जितके सामने एक खेळाडू खेळतो त्याची बेरीज केली तर रोहितच सर्वात पुढे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यंदाच्या आयपीएलच्या विजेतेपदाच्या रकमेत तसेच स्पर्धेच्या एकूण खर्चात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व आयपीएल समितीने कपात केली असली तरी रोहितप्रमाणेच अन्य खेळाडूंचे कोणतेही नुकसान होणार नसल्याचेही संकेत मिळाले आहेत. रोहितला 2018 साली झालेल्या लिलाव प्रक्रियेत मुंबई इंडियन्सने 15 कोटी रकम देऊन आपल्याकडेच कायम राखले होते.