#INDvsWI : रोहित शर्माला आणखी एका विक्रमाची संधी

लॉडरहिल – मर्यादित षटकांच्या सामन्यांमधील विक्रमवीर म्हणून नावलौकिक मिळविलेल्या रोहित शर्माला येथे आणखी एका विक्रमाची संधी मिळणार आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा ख्रिस गेलचा विक्रम त्याच्याकडून मोडला जाण्याची शक्यता आहे.

गेलने आतापर्यंत 58 सामन्यांमध्ये 105 षटकार ठोकले आहेत. रोहितने आतापर्यंत 94 सामन्यांमध्ये 102 षटकारांची बरसात केली आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मानही त्यानेच मिळविला आहे. त्याने 32.27 च्या सरासरीने 2 हजार 331 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 4 शतके व 16 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने इंग्लंडमध्ये झालेल्या एक दिवसीय विश्‍वचषक स्पर्धेत पाच शतके टोलवित सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम नोंदविला होता.

गेल या 39 वर्षीय खेळाडूने भारताच्या दौऱ्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असून तो टी-20 मालिकेत सहभागी झालेला नाही. साहजिकच रोहितला त्याचा विक्रम पार करता येईल अशी अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.