चेन्नई -आयपीएल 2021 मध्ये मंगळवारी झालेल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर 6 विकेटनी विजय मिळवला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 9 बाद 137 धावा केल्या. उत्तरादाखल दिल्लीने अखेरच्या षटकात विजय मिळवला.
या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांची कामगिरी अतिशय खराब झाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधार रोहित शर्माचा निर्णय अंगलट आला. क्विंटन डी कॉक बाद झाल्यानंतर रोहित आणि सूर्यकुमार यांनी डाव सावरला पण सूर्यकुमार मोठी धावसंख्या करू शकला नाही.
त्यानंतर चांगल्या फॉर्ममध्ये असलेला रोहितदेखील 44 धावांवर बाद झाला. मधळ्या फळीतील फलंदाजांनी फक्त हजेरी लावली. इशान किशन आणि जयंत यादव यांच्यामुळे मुंबईला धावा करता आल्या.
दिल्लीची सुरुवात फार चांगली झाली नसली तर शिखर धवन आणि स्मिथ यांनी अर्धशतकी भागीदारी केली आणि विजयाचा पाय रचला. मुंबईच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आणि सामना अखेरच्या षटकापर्यंत नेला. अखेर दिल्लीने विजय मिळवला.
दरम्यान, या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला पराभवासोबत आणखी एक झटका बसला आहे. मुंबईच्या गोलंदाजांनी धिम्या गतीने गोलंदाजी केल्यामुळे त्याला 12 लाख रुपये इतका दंड झालाय. मुंबईने हा हंगामात प्रथमच स्लो ओव्हर रेटचा नियम मोडला.