लंडन – भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने विस्डेनने गौरव केला आहे. या दोघांसह एकूण पाच क्रिकेटपटूंना गौरवण्यात आले आहे. रोहित व बुमराह यांच्यासह न्यूझीलंडचा ड्वेन कॉनवे, इंग्लंडचा ओली रॉबिन्सन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाची डेन व्हॅन निकर्क यांनाही या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
बुमराहने इंग्लंड दौऱ्यात केलेल्या कामगिरीबद्दल हा मान देण्यात आला आहे. बुमराहने या दौऱ्यात 4 सामन्यांत 18 बळी घेतले होते.
इंग्लंड दौऱ्यावर चार कसोटी सामन्यांमध्ये भारताने 2-1 अशी आघाडी मिळवण्यामध्ये रोहितच्या फलंदाजीचे मोठे योगदान होते.
रोहितने पहिल्या सामन्यात 36 आणि 12 धावा केल्या होत्या. दुसऱ्या कसोटीत त्याने 83 आणि 21 धावा आणि तिसऱ्या कसोटीत 19 आणि 59 धावा केल्या. चौथ्या सामन्यात त्याने पहिल्या डावात 11, तर दुसऱ्या डावात 127 धावा केल्या.
न्यूझीलंडच्या कॉनवेने कसोटी पदार्पणाच्या सामन्यातच द्विशतक फटकावले होते, तर द हंड्रेडच्या पहिल्या सत्रात ओव्हलच्या संघाला विजय मिळवून देण्यात दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू खेळाडू डॅन वेनचा मोठा वाटा होता.