रुग्णांची हेळसांड थांबणार;आरोग्य सुविधेचा प्रश्न सुटणार
कर्जत जामखेड : मतदारसंघातील आरोग्याच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करत आमदार रोहित पवार यांनी सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या ट्रामा सेंटरसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
तालुक्यातील मिरजगाव परिसरात हे ट्रामा सेंटर होणार असुन यासाठी त्यांच्याकडुन पाठपुरावा सुरू आहे.आरोग्य सुविधेचा प्रश्न बिकट असताना तात्काळ उपचाराअभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना आहेत.त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आमदार रोहित पवार यांना करण्यात आली होती.
ग्रामीण भागातील आरोग्याच्या प्रश्नाबाबत पवार यांनी आता मोठे पाऊल उचलले आहे.आमदार रोहित पवार यांनी नुकतीच नागपुर येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल येथे भेट देऊन तेथील कामकाज व आरोग्याच्या सुविधांबाबत माहीती घेतली.
आशियातील सर्वात मोठे व १९६ एकर क्षेत्रात स्थित असलेले हे हॉस्पिटल असुन तेथे कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात,तेथील कामाची पद्धत काय आहे? आणि याच अनुषंगाने कर्जत-जामखेड मतदारसंघात आपण कोणत्या सुखसुविधांची अंमलबजावणी करू शकतो?
याबाबत माहीती घेतली.यावेळी या कॉलेज व हॉस्पिटलचे डीन डॉ.सजल मित्रा,डॉ.एम.डी.फैसल,डॉ.अविनाश गावंडे आदींनी या ट्रामासेंटर बद्दल माहीती दिली.एकाचवेळी अनेक जखमींना किंवा रुग्णांवर आपत्कालीन उपचारासाठी सिटी स्कॅन,एम आर आय, आयसीयु,सर्जरी असे प्रमुख विभाग या ट्रामा सेंटरमध्ये उपलब्ध असतात.
त्यासाठी तेथे असणारे तज्ज्ञ डॉक्टर,न्युरोसर्जन,ऑर्थोपेडिक सर्जन या विभागात तैनात असतात. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यास हा विभाग सज्ज असतो.मात्र मतदारसंघात ही सुविधा उपलब्ध नसल्याने बारामती,पुणे,नगर आदी ठिकाणी उपचार घ्यावे लागतात.
मात्र वेळीच उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.आमदार पवार यांच्या प्रयत्नातुन लवकरच आरोग्य सुविधेचा प्रश्न सुटणार आहे.