रोहित पवार यांच्या उमेदवारीला गटबाजीचे सावट

किरण जगताप

कॉंग्रेसकडूून उमेदवारीचा दावा; राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष

पवारांचा निवडणूक धमाका

रोहित पवार यांनी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून या मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचा धडाका सुरू केला आहे. विविध अमिषे दाखवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु हा निवडणूक धमाका असल्याची आता जोरदार चर्चा आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी किंवा त्या पक्षाच्या नेत्यांना कधी हा मतदारसंघ दिसला नाही. त्याच्या अडचणी सोडविता आल्या नाही. मग आताच का हे उपक्रम आणि मतदारांचा कळवळा असा सवाल उपस्थित होत आहे. 

कर्जत – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांची कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभेची जोरदार तयारी सुरू आहे. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचण्याची मोहीम राबवली आहे. मात्र त्याच्या उमेदवारीला गटबाजीचे सावट निर्माण झाले आहे. पक्षांतर्गत गटबाजी उफाळून येण्याची शक्‍यता असून मित्रपक्ष असलेल्या कॉंग्रेसने देखील त्याचा फायदा घेवून या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे पवार यांची तयारी व्यर्थ तर जाणार नाहीना अशी शंका व्यक्‍त होत आहे.

कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी या जागेसाठी जोरदार दावा केला आहे. त्याचबरोबर त्यांच्याच पक्षातील महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड यांनीही उमेदवारासाठी दावा केला असून यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे रोहित पवार यांची उमेदवारीवर दुहेरी सावट आहे. कर्जत जामखेड मतदार संघात जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या प्रा.राम शिंदे यांच्याबरोबर लढत असल्याने कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर मोठे आव्हान आहे. काही दशकांपूर्वी हा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. आघाडीमध्ये ही जागा कॉंग्रेसची राहिल्याने कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष साळुंके यांनी या जागेवर जोरदार दावा केला आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जागा कॉंग्रेस लढविणार असल्याचा दावा त्यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे पवार यांच्या उमेदवारीस हा मोठा अडथळा मानला जात आहे.

अनेक दशके कुळधरण गटावर निर्विवाद वर्चस्व असलेल्या गुंड यांनीही उमेदवारीसाठी जोरदार दावा केला आहे. या मतदारसंघासाठी कर्जत तालुक्‍यातील अनेक उमेदवार असावा अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मागणी आहे. शरद पवार यांच्याकडून राजकारणात महिलांना प्राधान्य दिले जात असल्याने आपली उमेदवारी निश्‍चित असल्याचे गुंड सांगत आहेत. गुंड यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही भूषवलेले आहे. त्यांचे पती पंचायत समितीचे सदस्य असून त्यांना मानणारा कर्जत व जामखेड तालुक्‍यात मोठा वर्ग आहे. त्यांचे सासरे बापूसाहेब गुंड हे तालुक्‍यातील राजकारणाची चाणक्‍य म्हणून ओळखले जातात.

या सर्व जमेच्या बाजू गृहीत धरून गुंड यांच्या दाव्यालाही विशेष महत्त्व आहे. स्वतः दावेदार असल्याने त्यांनी पवार यांच्या कर्जत तालुक्‍यातील कित्येक कार्यक्रमाला दांडी मारली आहे. गुंड यांचे कार्यकर्ते जोरदार कामाला लागल्याने राष्ट्रवादीकडून नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाते. हा औत्सुक्‍याचा मुद्दा आहे. गुंड यांना डावलून पवार यांची उमेदवारी निश्‍चित झाल्यास गुंड कोणता राजकीय निर्णय घेतात हेही महत्त्वाचे आहे. महिला व स्थानिक उमेदवार हे मुद्दे सांगत मंजुषा गुंड अधिकाधिक आक्रमक होत चालल्या आहेत. त्यामुळे पवार यांना मित्र पक्ष कॉंग्रेस तसेच पक्षांतर्गत संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.