जामखेड – मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाला असला तरी अन्यमंत्र्यांचा शपथविधी व खातेवाटप अद्याप झाले नाही. दोन्ही पक्षातील बरेच नेते आणि आमदार मंत्रीपदासाठी उत्सुक आहेत. त्यात आता कोणाची वर्णी लागते हे पहाणे महत्वाचं ठरणार आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपद मिळणार आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद लवकरच रिक्त होणार आहे. आता या पदासाठी नुकतेच विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आलेले प्रा. राम शिंदे यांचे नाव पुढे आले असून “ओबीसी’ चेहरा म्हणून आ. शिंदे यांना प्रदेशाध्यक्षपद देऊन राज्यात “नव समीकरण’ करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तर दुसरीकडे राज्यातील सत्तांतरानंतर कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्यामधील संघर्ष तीव्र होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विकासाच्या कामात अडथळे आणले तर खपून घेणार नाही, असा इशाराच आता रोहित पवार यांनी राम शिंदे यांना दिला आहे. दरम्यान, कर्जत जामखेड मतदारसंघात अन्नसुरचना योजनेअंतर्गत शिधापत्रिका वाटप कार्यक्रमाच्या वेळेस रोहित पवार यांनी राम शिंदेंवर टीकाही केली आहे.
दरम्यान, अडीच वर्ष कोमात असलेल्या कर्जत-जामखेड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांना राम शिंदे यांना मिळालेल्या आमदारकीमुळे ‘नवं चैतन्य’ निर्माण झाले आहे. ही अडीच वर्ष प्रा. शिंदेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी खूप अडचणीची गेली. अनेकवेळा संघर्षाला तोंड द्यावे लागले. सत्तेपुढे काहीच न चालल्याने गप्प बसावे लागले. पण आता आमदार झाल्याने अडीच वर्षांचा ‘वनवास’ संपल्याने ‘राम’ आता नवी उमेद घेऊन राजकीय रणांगणात उतरले आहेत.