अहमदनगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 297वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या अहमदनगरमधील चौंडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावरून भाजप नेते व माजी मंत्री राम शिंदे यांनी या जयंतीला आमदार रोहित पवारांकडून राजकीय स्वरूप देण्यात आले असून हा जयंती उत्सव नसून राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा असल्याची टीका केली आहे. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार म्हणाले, राज्याच्या कानाकोपऱ्यातून सगळ्या विचारांची लोक इथे येत आहेत. ज्या पद्धतीने आधी कार्यक्रम होत होते त्याच पद्धतीने आताही कार्यक्रम होणार आहे. एकत्रित पद्धतीने कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न इथल्या ग्रामपंचायत,कर्जत जामखेडच्या नागरिकांनी घेतला आहे. राष्ट्रवादीने हा कार्यक्रम हायजॅक केला आहे असे एकाच पक्षाकडून म्हटले जात असावे. आमच्या बॅनर्सवर कोणत्याही पक्षाचे चिन्ह नाही. पण काही बॅनर्सवर त्यांच्या पक्षाचे चिन्ह आहेत. हा राजकीय कार्यक्रम नाही आणि यामध्ये कुणीही राजकारण आणू नये.
राम शिंदे यांनी केले ‘हे’ आरोप
कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला असून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक नेते आणि मान्यवरांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या जयंतीला आमदार रोहित पवारांकडून राजकीय स्वरूप देण्यात आले असून हा जयंती उत्सव नसून राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा आहे. दरम्यान, अहिल्यादेवी भक्तांची कुचंबना होतेय, या जयंतीला राजकीय स्वरूप देणे चुकीचे आहे. प्रशासनावर राजकीय दबाव देण्यात येत असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज चौंडी येथे अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे सुद्धा चौंडी येथे पोहोचणार आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोप आज चौंडीत होणार आहे. त्यामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी शरद पवार आणि गोपीचंद पडळकर हे आमने-सामने येणार आहेत.