पुणे – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात चर्चेत आलेले बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी काल स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. त्यांचा राजीनामा राज्यपालांनी मंजूर केला असून बिहार निवडणुका तोंडावर आल्या असतानाच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती जाहीर केल्याने ते आता राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
ही चर्चा सुरु असतानाच कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी गुप्तेश्वर पांडे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक ट्विट करत, ‘पांडे यांना मागील काही दिवसांमधील कठोर परिश्रमांचे फळ नक्की मिळेल’ असा टोला लगावला आहे. यासोबतच पवार यांनी पांडे यांचा स्वेच्छानिवृत्तीची घोषणा करतानाच एक फोटो देखील शेअर केला आहे. यात पांडे यांनी गळ्याभोवती ‘भगवा’ गमछा गुंडाळल्याचं दिसतंय.
रोहित पवार लिहतात, “बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी पुन्हा एकदा निवडणुकांच्या तोंडावर स्वेच्छानिवृत्ती जाहीर केल्याबाबत त्यांना शुभेच्छा. २०११ प्रमाणे पदरी निराशा न पडता यंदा पांडे यांच्या मागील काही दिवसांमधील कठोर परिश्रमांचे फळ नक्की मिळेल अशी अपेक्षा. ते राजकारणातील एक मुरलेले खेळाडू ठरतील.”
बिहार के DGP गुप्तेश्वर पांडेजी को पुनः चुनावो के ठीक पहले रिटायरमेंट लेने पे मेरी बधाई। उम्मीद करता हूं उनके पिछले कुछ दिनों की कड़ी मेहनत इस बार रंग लाएगी और उनको २०११ की तरह निराश नहीं होना पड़ेगा। मेरा मानना है वो राजनीति में एक मंझे हुए खिलाड़ी साबित होंगे। pic.twitter.com/XI5uIU99Bv
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 23, 2020
तत्पूर्वी, पांडे यांनी २००९ सालीही लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पोलीस दलाच्या सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. पांडे हे बिहारमधील १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सुशांत प्रकरणामध्ये अनेक वेळा थेट मुंबई पोलिसांच्या तपासावर पांडे यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या वक्तव्यांमुळे ते चांगलेच चर्चेत होते.