अनुजाच्या शिक्षणाची जबाबदारी रोहित पवारांनी उचलली 

होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी
राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी सांगितले की, मी अनुजासारख्या होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी समाजघटक म्हणून कायम उभा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी अनुजाचा आदर्श समोर ठेवून शिक्षण घ्यायला हवे.

जवळा  – अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द व हुशारीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत 90.80 टक्के गुण मिळवणाऱ्या जवळा येथील अनुजा शहाजी रोडे या विद्यार्थिनीची यशोगाथा दैनिक प्रभातने मांडली होती. तसेच तिला पुढील शिक्षणासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. दैनिक प्रभातच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवा नेते रोहित पवार यांनी तिच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले.

अनुजाचा निकाल जरी चांगला लागला होता तरी तिला आणि आईला पुढच्या शिक्षणाची चिंता लागली होती. कारण अनुजाच्या वडिलांचे सात वर्षापुर्वी निधन झाले होते. आजपर्यंत अनुजा आणि शुभमचे शालेय शिक्षण तिचे आईने लोकांच्या शेतात मोलमजुरी करून पूर्ण केले. परंतु त्यांच्या तेवढ्या उत्पन्नावर अनुजाचे पुढील शिक्षण शक्‍य नाही हे त्यांना माहित होते. पण अनुजाची तर शिकण्याची प्रचंड इच्छाशक्ती आहे. यातून मार्ग काढणे त्यांना मोठ्या जिकरीचे झाले होते.

दैनिक प्रभात मधील बातमी वाचली आणि समाजातील काही घटकांनी आपली मदतीची इच्छा मोठ्या मनाने बोलून दाखवली आणि तशी तयारीही दर्शविली. परंतु अनुजाला चिंता लागून होती ती संपूर्ण शिक्षणाची. जवळ्याचे ग्रामपंचायत सदस्य दयानंद कथले यांनी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहितदादा पवार यांच्याकडे मदतीचे आवाहन केले. पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवून तिच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार पवार यांनी त्यांचे सहकारी बारामती ऍग्रोचे संचालक सुभाष गुळवे यांना मदत करण्यास सांगितले. त्यांनंतर गुळवे यांनी अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदानगर ता. बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालय येथे प्रवेश करण्याची ग्वाही दिली आणि तशी सूचनाही महाविद्यालयीन प्रशासनाला दिली. त्यांच्या सूचनेनुसार अनुजाचा महाविद्यालयीन प्रवेश दि.13 जून रोजी झाला.

अनुजा ही लहानपणापासूनच हुशार आणि कष्टाळू मुलगी आहे तिने खूप अभ्यास करून हे यश मिळवले आहे, याचा खूप आनंद आहे. समाजातील मदत करू इच्छिणाऱ्या सर्व समाज घटकांचे मी आभार मानते. रोहित पवार यांनी अनुजाच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली त्याबद्दल त्यांचे आभार.

– किसाबाई रोडे, अनुजाची आई.

Leave A Reply

Your email address will not be published.