Maharashtra Elections: खर्चात रोहित पवार आघाडीवर

जामखेड: कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांच्या प्रत्येक हालचाली व प्रचारावर निवडणूक विभागाच्या कॅमेऱ्याची नजर असून मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची पहिल्या टप्प्यातील पडताळणी शुक्रवारी करण्यात आली. यामध्ये राष्ट्रावादी कॉंग्रेसचे उमेदवार रोहित राजेंद्र पवार यांनी 3 लाख 16 हजार 70 रुपयांचा खर्च सादर करून खर्चात आघाडी घेतली आहे. भाजपचे उमेदवार प्रा. राम शंकर शिंदे यांनी 1 लाख 24 हजार 80 रुपयांचा खर्च सादर केला आहे.

विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला प्रचारासाठी होत असलेल्या खर्चाची माहिती निवडणूक विभागाच्या खर्च नियंत्रण समितीकडे सादर करणे बंधनकारक आहे. यासाठी निवडणुकीकरीता स्वतंत्र खाते उघडणे बंधनकारक असून दहा हजारापर्यंतचे देणे रोखीने तर त्यापुढील देणे धनादेशाद्वारे देण्याचे आदेश आहेत. तसेच प्रत्येक उमेदवाराला त्यांनी निवडणुकीसाठी केलेला खर्च तीन टप्प्यात सादर करण्याचे निर्देश आहेत. यानुसार कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी आपआपले खर्च निवडणूक विभागाकडे सादर केले आहेत. यामध्ये उमेदवाराने निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या विहित खर्चाच्या मर्यादेचे काटेकोर पालन करावे, खर्च नोंदवही, बॅंक पासबूक, व्हावचर आदी माहिती अद्यावत ठेवणे बंधनकारक आहे. तसेच निवडणूक खर्चासाठी असलेल्या बॅंक खात्याची माहिती सादर करणे, खर्चाचे बील, व्हावचर ठेवणे आदींबाबत सूचना केलेल्या आहेत.

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात दि. 11 पर्यंत 6 उमेदवारांनी आपला खर्च सादर केला. यामध्ये पवार – 3 लाख 16 हजार 70 इतका खर्च सादर करून आघाडी घेतली आहे तर भाजपचे उमेदवार राम शिंदे-1 लाख 24 हजार 80 यांनी इतका खर्च सादर केला. याव्यतिरिक्‍त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अप्पासाहेब नवनाथ पालवे – 11 हजार 300, जनहित लोकशाही पार्टी उमेदवार सोमनाथ भागचंद शिंदे – 21 हजार 950, अपक्ष उमेदवार ज्ञानदेव नरहरी सुपेकर – 12 हजार 910, अपक्ष उमेदवार सुमित कन्हैया पाटील 10 हजार 500 इतका पहिल्या टप्प्यातील खर्च आयोगाकडे सादर केला. बाकीच्या सहा उमेदवाराचा खर्च अद्याप सादर झाला नाही.


उमेदवारास 28 लाख खर्चाची मर्यादा

प्रत्येक उमेदवारास विधानसभा निवडणुकीसाठी 28 लाख रुपये खर्चाची मर्यादा देण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवाराने 10 हजारांवरील खर्च धनादेशाद्वारे करावा असेही निर्देश देण्यात आले आहेत. तसेच निवडणुकीत ज्या बाबींवर खर्च होणार आहे. त्यांचेही दर आयोगाने निश्‍चित केले असून आयोगाने दिलेल्या विहीत खर्चाच्या मर्यादेचे उमेदवाराने काटेकोरपणे पालन करावे, खर्चाच्या नोंदवही ठेवाव्यात, बिल सादर करावेत असेही आवाहन आयोगाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.