मुंबई – वाढती महागाई आणि इंधन दरवाढ यावरून काँग्रेस आक्रमक झाले असून महिला काँग्रेसच्यावतीने केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांचा जाहीर निषेध कऱण्यात आला. स्मृती इराणी हॉटेलवर पोहचण्याआधीच त्यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली. तर दुसरीकडे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली घोषणाबाजी आणि त्यात भाजपा पदाधिकाऱ्याकडून राष्ट्रवादीच्या महिला नेत्या वैशाली नागवडे यांच्यावर हात उचलल्याच्या प्रकरणावरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. या गोंधळावरून सध्या राज्यातलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. याप्रकरणी भाजपाच्या संबंधित कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले,’गॅस सिलिंडर ३५० रुपयांना मिळत असताना एकेकाळी रस्त्यावर उतरून महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती ताईंच्या स्मृती जागृत करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे.’
त्यांनी पुढे ट्विटमध्ये म्हटले आहे की,’“भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये आणि या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी”, असं देखील रोहीत पवारांनी म्हटलं आहे.
रोहित पवार यांचे ट्विट
गॅस सिलिंडर ३५० रुपयांना मिळत असताना एकेकाळी रस्त्यावर उतरून महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती ताईंच्या स्मृती जागृत करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे.@smritiirani
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 17, 2022