Sharad Pawar Vs Ajit Pawar । Diwali Padwa 2024 । राज्यातील विधानसभा निवडणुकीत काही विधानसभा मतदारसंघाची चांगलीच चर्चा आहे. त्यात सर्वात जास्त चर्चेत बारामती हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात अजित पवार आणि शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याठिकाणी युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यात सरळ -सरळ सामना होणार आहे.
दरम्यान, दोन्ही गटाकडून आपले शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून दोन्ही पवारांकडून आज बारामतीमध्ये दिवाळी पाडव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याची भेट घेण्यासाठी गर्दी केल्याचं दिसून आलं.
बारामतीमध्ये शरद पवारांचा तर काटेवाडीमध्ये अजित पवार यांचा पाडवा होत आहे. यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“शरद पवारांनी दिवाळी पाडव्याची प्रथा सुरू केली होती आणि त्यामध्ये अजित पवार सहभागी व्हायला लागले होते’, असं रोहित पवार म्हणालेत. तर बारामतीतील काटेवाडीमध्ये दिवाळी पाडवा होतोय, हा अजित पवाारांचा वैयक्तिक निर्णय असल्याचेही रोहित पवार म्हणाले.
पुढे ते असेही म्हणाले, ‘गेल्या 50 ते 55 वर्षांपासून राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शऱद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गोविंदबागेत यायचे. त्यानंतर अजित पवार सहभागी झाले.
मग सुप्रिया सुळे सहभागी झाल्यात नंतर मी आलो त्यानंतर ही दिवाळी पाडव्याची परंपरा सुरू झाली आणि आजही आहे. शरद पवार जिथे उभे राहतात तिथे लोकं त्यांना भेटतात.
आता अजित दादांनी वेगळा निर्णय घेतला तर मला त्यावर काही बोलता येणार नसल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. पण पवार कुटुंबात दोन दिवाळी पाडवे होतायत हे दुःखदायक आहे, असं रोहित पवार म्हणाले.
1967 सालापासून दिवाळी पाडव्याचे आयोजन…
दरम्यान,प्रत्येक दिवळीला शरद पवार यांच्याकडून बारामतीत दिवाळी पाडव्याचे आयोजन केले जाते. या दिवशी सर्व पवार कुटुंब एकत्र येते. या दिवशी शरद पवार हे लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात.
यावेळी मात्र अजित पवार यांनी काटेवाडी येथे आपल्या वेगळ्या दिवाळी पाडव्याचे आयोजन केले आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे 1967 साली पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हापासून दरवर्षी आमच्याकडे हा अपक्रम आयोजित केला जातो, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.