मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या राज्याचे आराध्य दैवत आहेत. घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. हा पुतळा भारतीय नौदलाने उभारला होता. याचे संपूर्ण डिझाइन नौदलाने तयार केले होते. 45 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहत होते. या सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये पुतळ्याचे नुकसान झाले, असे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची जबाबदारी नौदलाची होती. त्यांच्याकडे पुतळ्याचे देखभालीचे कामही होते, असे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे. तर, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही या घटनेबाबत खेद व्यक्त केला. हा एक अपघात आहे. कदाचित वाईटातून चांगले घडावे, यासाठी हा अपघात घडला असावा. परंतु आता चांगल्या गोष्टी घडतील. याठिकाणी 100 फुटांचा पुतळा उभारावा, अशी लोकांची मागणी होती. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हाच संदर्भ देत आमदार रोहीत पवार यांनी टीका केली आहे. संपूर्ण राज्याच्या भावना दुखावणारी एवढी दुर्दैवी घटना घडलेली असताना वाऱ्याचा वेग होता, अपघात घडला; नौदलाची जबाबदारी होती ही कारणे देणे सरकारला शोभत नाही. मुळात आपल्या सरकारमध्ये वाऱ्याच्या वेगाने जी दलाली खाल्ली जात आहे, ना त्याचाच परिणाम म्हणजे हा अपघात आहे. दलालांना पोसण्याच्या या पापाचा हिशेब महायुतीला द्यावाच लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.
शाळकरी विद्यार्थ्यांना गणवेश केव्हा मिळतील? यावर उत्तर देताना दीपक केसरकर अडखळतात. पण काहीतरी चांगले घडावे म्हणून हा अपघात झाला असेल, असे सांगताना तुमची जीभ अडखळली नाही का? याहून मोठे स्मारक बांधू असे तुम्ही सांगत आहात, याहून मोठे म्हणजे अरबी समुद्रात देवेंद्र फडणवीस यांनी उभारलेल्या स्मारकापेक्षा मोठे स्मारक उभारणार आहात का? पण वेदांत फॉक्सकॉन गुजरातला गेल्यावर देखील याहून मोठा प्रकल्प आणू, असा शब्द सरकारने दिला होता. त्यामुळे आता विश्वास कसा ठेवायचा? हे सरकारनेच सांगावे, असे त्यांनी सुनावले आहे.