पुणे – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. तर शरद पवार यांचे दुसरे नातू रोहित पवार हे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. रोहित पवार हे सध्या जिल्हा परिषदेचे सदस्य असून, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून रोहित पवार यांच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात निर्णय घेतला जाईल असे शरद पवार यांनी सांगितले आहे.
पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना शरद पवार यांनी रोहित पवार यांच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात पक्षातील नेत्यांशी चर्चा करून मतदारसंघ निवडण्यात येईल असे म्हंटले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पार्थ पवार यांच्या बरोबरच रोहित पवार यांनी देखील काही भागात निवडणूक प्रचाराला हजेरी लावली होती.
दरम्यान, शरद पवार यांचे पुतणे अजित पवार आणि कन्या सुप्रिया सुळे या सक्रिय राजकारणात असून, नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत पार्थ पवार यांनी राजकारणात एन्ट्री घेतली आहे.